LIVE UPDATES

Eknath Shinde Nana Patekar Tribute : ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान हरपला’

नाना पाटेकरांच्या निधनावर एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 14:16 PM
views 72  views
Eknath Shinde Nana Patekar Tribute

मुंबई : नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. 

नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले की, "महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे." महाराष्ट्राने आणि देशाने एक संवेदनशील, तगडा अभिनेता व खऱ्या अर्थाने एक 'नटसम्राट' गमावला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला..." असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले. "नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातच आमची भेट झाली होती. माझ्या दरेगावी गाळ उपसण्याच्या कामासाठी देखील ते आले होते, तेव्हा पांढऱ्या कपड्यांकडे बघत त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं. "एकही डाग नसलेला नेता!" २०२२ मधील राजकीय उठावानंतरच्या पहिल्या खाजगी भेटीत पाठीवर हात ठेवून "काय क्रांतिवीर..." अशी त्यांनी दिलेली साद आणि ती कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. त्या शब्दांनी जनतेसाठी अधिक काम करण्याची ऊर्जा दिली.

तरुणपणी 'क्रांतिवीर', 'तिरंगा', 'प्रहार' यांतील त्यांच्या भूमिकांनी आमच्या पिढीवर गारुड केले. 'हमिदाबाईची कोठी', 'पुरुष', 'तन-माजोरी' ही नाटके आणि 'देऊळ', 'यशवंत', 'वजूद', 'परिंदा' हे चित्रपट त्यांच्या अजरामर भूमिकांमुळे कायम लक्षात राहतील. 

कुठलाही गॉडफादर नसताना, निव्वळ ताकदीच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ब्रँड उभा केला. बॉलीवूडमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा होता आणि त्या दबदब्यात मराठी माणसाचा स्वाभिमान अन् बाणा त्यांनी ताठपणे जपला. नाना केवळ महान कलाकार नव्हते, तर ते महाराष्ट्राचा स्वाभिमान होते. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे त्यांचे काम सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे.

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला आहे. मी एक सच्चा, दिलदार मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्यासारखा अभिनेता शतकातून एकदाच जन्माला येतो. काश्मीरमधील मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं त्यांचं अखेरचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तीच नाना पाटेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.