
मुंबई : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेसला आजपासून सुरुवात झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या रेल्वेसेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
या शुभारंभप्रसंगी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही नियमित सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोकणवासियांची ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
'या' स्थानकांवर थांबा
या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. ही विशेष गाडी सीएसएमटी वरून दुपारी १२:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
मुंबई–कोकण प्रवासासाठी नियमित रेल्वेसेवा उपलब्ध झाल्याने चाकरमानी, विद्यार्थी, व्यावसायिक, पर्यटक तसेच कोकणातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून, या सेवेमुळे कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










