
वेंगुर्ले : शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था, इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड (ताज) आणि एमटीडीसी यांचा त्रिपक्षीय करारावर आज गुरुवार ३ सप्टेंबर वेंगुर्ले येथे रजिस्टर कार्यालयात शिरडा वेळागर जमीन मालक संस्था, ताज कंपनी आणि एमटीडीसी यांच्या सह्या झाल्याने अंतिमता करार नोंदणीकृत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जे सानूग्रह अनुदान मिळणार आहे ते मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून ताज प्रकल्पाची पुढील प्रक्रिया आता सुरू होणार आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती संस्थेचे सचिव मंगेश डोंगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, संचालक, हॉटेलचे अधिकारी तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते. शेतकऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान वाटप करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. परंतु शेतकऱ्यांचे काही पेपर म्हणजेच बाँड तयार करायचे आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची तब्येत चांगली नाही त्यांची ऑथॉरिटी घेणे आणि अन्य पेपर तयार झाले की लगेच गणपतीच्या पूर्वी अनुदान वाटपाची शेतकऱ्यांना आम्ही आनंदाची बातमी देऊ असा आम्हाला विश्वास आहे.
शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्प होण्यासाठी कोकणचे नेते माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, आमच्या भागाचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी आम्हाला पहिल्यापासून खूप सहकार्य केलेल आहे. हा संपूर्ण करार होण्यासाठी त्यांनाही आम्ही संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो.
आजचा करार होत असताना आम्हाला आतापर्यंत फार मोलाची साथ दिलेले सिंधुदुर्ग बँक जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे आजही आमच्या सोबत वेंगुर्ले येथे उपस्थित तसेच या संस्थेचे अध्यक्ष शरद उर्फ नंदू कांबळी, संचालक जगन्नाथ डोंगरे, लक्ष्मीकांत उर्फ विनू नाईक, संतान पावलू सोझ, सल्लागार तज्ज्ञ संचालक जनार्दन पडवळ त्याच प्रमाणे एमटीडीसी चे जिल्हास्तरीय अधिकारी दीपक माने इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे अधिकारी सँवीओ डीमेलो, सिंथीयाल नरोना आदी उपस्थित होते.
शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था मर्यादित. या संस्थेचे सचिव मंगेश डोंगरे पुढे म्हणाले की मुंबई मंत्रालयात ताज हॉटेल प्रकल्पासंदर्भात केलेला त्रिपक्षीय करारातील रजिस्ट्रेशन चे काम आज पूर्ण झाले. आता प्रकल्पाची पुढील कामे लवकरच सुरू होणार असल्याने आम्हाला आनंद आहे असेही श्री डोंगरे आणि सर्व संचालकांनी सांगितले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच रोजगाराचे दालन होणार खुले
पालकमंत्री नितेश राणे यांनी त्रिपक्षीय करार होण्यास खूप प्रयत्न केले. त्यामुळे शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या प्रकल्पामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांचे वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यात अभिनंदन होत आहे. शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्थेने ही पालकमंत्री नितेश राणे यांना धन्यवाद देऊन त्यांच्या मुळेच हा अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागणार आहे याचा आनंद व्यक्त केला.











