LIVE UPDATES

प्रकाश निकम यांनी स्वीकारला बेळगाव पोलीस आयुक्तपदाचा पदभार

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 19:45 PM
views 56  views

बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तपदाचा पदभार 2012 बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांनी गुरुवारी स्वीकारला. गुरुवारी दुपारी बेळगाव पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या निकम यांना पोलिसांकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पदभार हस्तांतरणाची औपचारिक प्रक्रिया पार पडली. 

प्रकाश निकम यांनी सुमारे 14 वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून बेळगावात सेवा बजावली होती. तब्बल 14 वर्षांनंतर गुरुवारी ते बेळगावचे नवे पोलीस आयुक्त म्हणून शहरात परतले. त्यांनी मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी डीसीपी नारायण बरमनी, डीसीपी अरस, पोलीस अधीक्षक रामराजन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

निकम यांनी सांगितले की, प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून मी सुमारे सहा महिने 2012-13 मध्ये बेळगावात सेवा बजावली. त्यावेळी बेळगाव जिल्हा पोलीस व्यवस्थेअंतर्गत होता. प्रशिक्षणाच्या काळात मी बेळगाव, गोवा आणि शेजारील महाराष्ट्र यांच्यातील आंतरराज्यीय प्रश्नांचाही सखोल अभ्यास केला होता. गेल्या काही वर्षांत परिस्थितीत मोठा बदल झाला असून येथे पोलीस आयुक्तालय झाले आहे. त्यामुळे सर्वप्रथम सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

भव्य गणेशोत्सव उत्सव शांततेत पार पाडणे हे प्राधान्य 

सध्या आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान गणेशोत्सवाचे आहे. हा उत्सव सुरळीत, शांततेत पार पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून स्थानिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्यांचे सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

बेळगावातील गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताचा पूर्वीचा अनुभव असल्याचे सांगताना निकम म्हणाले, बेळगावातील गणेशोत्सवाबाबत मला माहिती आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना मी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडल्याने येथील उत्सवाची व्याप्ती आणि स्थानिक परिस्थितीची मला चांगली कल्पना आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून संवेदनशील किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आपल्या कार्यकाळात राबविलेल्या चांगल्या उपक्रमांना पुढे नेण्याचेही निकम यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्थापन, सायबर गुन्हे आणि इतर पोलिसिंगशी संबंधित आव्हानांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राउडी घटकांना राउडीगिरी थांबविण्याचा इशारा निकम यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि राउडी घटकांना दिला.

दरम्यान, पदभार हस्तांतरणानंतर बेळगाव पोलिसांच्या वतीने मावळते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासाठी भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.