
सिंधुदुर्गनगरी : तोंडवली-बावशी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
या प्रकरणात अतुल वासुदेव सदडेकर (वय ५८), मंदार राजाराम कुलकर्णी (४२) आणि प्रकाश रामचंद्र मेस्त्री (२८, तिघेही रा. तोंडवली, ता. कणकवली) या तिघांनाही तदर्थ न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस इंदलकर यांनी २ वर्षे कारावास आणि प्रत्येकी ६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
तोंडवली-बावशी ग्रामपंचायत कार्यालयात ८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. २५ मार्च २०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेत मंजूर झालेल्या टेंडरच्या ठरावाची प्रत आरोपींनी ग्रामसेव यांच्याकडे मागितली होती. ठरावाची प्रत मिळण्यासाठी लेखी अर्ज द्यावा लागेल आणि त्यानंतर प्रत देता येईल, असे ग्रामसेवक यांनी सांगितले. यावरून वाद निर्माण झाला.
आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कलम ३५३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. फिर्यादी यांनी घटनेचा सविस्तर घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला, तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार योगेश नारिंग्रेकर यांच्या साक्षीनेही अभियोजनाच्या प्रकरणाला महत्त्वाचा आधार मिळाला. उपलब्ध साक्षी-पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरविले. कलम ३५३ अंतर्गत दोन वर्षांचा कारावास व तीन हजार रुपये दंड, कलम ५०४ अंतर्गत सहा महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये दंड, तर कलम ५०६ अंतर्गत एक वर्षाचा कारावास व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.














