LIVE UPDATES

ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट !

मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत विकास आराखड्याचे सादरीकरण
Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2026 17:32 PM
views 409  views

  • फूड पार्क, नौकाविहारची संकल्पना 

सावंतवाडी : सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाच्या पुनरुज्जीवन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, “लोकांसाठी, जागेसाठी, पाण्यासाठी” या संकल्पनेवर आधारित व्यापक विकास आराखड्याचे सादरीकरण महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष युवराणी श्रद्धा सावंत भोसले तसेच युवराज लखम सावंत भोसले उपस्थित होते. शासन आणि राजघराणे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारा हा उपक्रम व्यापक जनहितासाठी असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पारंपरिक वारसा पर्यटन शहरांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन थर्टी स्क्वेअर, आरजेबी-सीपीएल (रतन जे. बटलिबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.) आणि पर्यावरण भागीदार एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट (ईडन एलएलपी) यांच्या सहकार्याने हा दूरदृष्टी आराखडा तयार करण्यात आला आहे.

मोती तलाव हा एकेकाळी सावंतवाडी शहरातील पाण्याचे नैसर्गिक संकलन केंद्र म्हणून ओळखला जात होता. त्याचे ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन तलाव परिसरातील भिंतींची स्वच्छता, संवर्धन आणि स्थिरीकरण करून संपूर्ण परिसंस्थेचे पुनर्संचयित करण्यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे.

या प्रकल्पाअंतर्गत फूड पार्क, नौकाविहार सुविधा, उत्सव चौक, घाट, दशावतार नाट्य आणि स्थानिक कला प्रकारांसाठी रंगमंडप उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. तसेच पारंपरिक घाटांच्या धर्तीवर शांत तलावकाठ विकसित करून पर्यटकांना आकर्षित करण्याचे नियोजन आहे.

स्थानिक संस्कृती, पर्यावरण आणि पर्यटन यांचा समतोल साधत सावंतवाडीच्या वारशाला आधुनिक विकासाची जोड देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात येणार आहे. मोती तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प हा सावंतवाडीच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रगतीशील पाऊल मानला जात आहे.