ठाण्यातील मालवणी महोत्सवाला मंत्री नितेश राणेंची भेट

कोकण भवन उभारणीची अपेक्षा व्यक्त
Edited by:
Published on: February 18, 2026 10:53 AM
views 133  views

मुंबई : ठाणे येथील शिवाई नगरमध्ये भाजपाचे नगरसेवक सीताराम राणे, अध्यक्ष – कोकण ग्राम विकास मंडळ यांच्यावतीने आयोजित मालवणी महोत्सव 2026 ला मंगळवारी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. या महोत्सवाचे यंदा २७ वे वर्ष असून सलग २७ वर्षे हा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मंत्री राणे यांनी यावेळी काढले.



कोकणची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि विशेषतः अस्सल मालवणी खाद्यसंस्कृतीचा स्वाद या महोत्सवात अनुभवायला मिळतो, असे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान उपस्थित चाकरमान्यांशी संवाद साधत त्यांनी मुंबई येथे कोकण भवन उभारण्याची मागणी महापौरांकडे केली असून, त्याचप्रमाणे ठाणे शहरातही कोकण भवन उभे राहण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबई व ठाण्यासारख्या शहरांच्या अर्थकारणात कोकणी माणसाचा प्रभावी आवाज पोहोचला पाहिजे. कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांना व्यापक संधी मिळाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. यावर्षी आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राणे साहेब आणि कोकणाचे अतूट नाते आहे. आम्हाला मिळालेली पदे ही कोकणी जनतेच्या आशीर्वादामुळेच मिळालेली असल्याने त्यांची सेवा करणे आणि कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मंत्री राणे यांनी आवर्जून केले. यावेळी आमदार संजय केळकर, आयोजक नगरसेवक सीताराम राणे, भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व कोकणवासीय मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.