
कणकवली : अल निनो व आयओडीच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कणकवली नगरपंचायतीने नागरिकांना पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या या आवाहनात शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील कोणत्याही प्रभागात किंवा नगरपंचायतीच्या मुख्य जलवाहिनीवर पाण्याची गळती आढळल्यास त्याची माहिती तात्काळ नगरपंचायत प्रशासनाला द्यावी, असे सांगण्यात आले आहे.
तसेच नागरिकांच्या घरातील नळ कनेक्शन, पाण्याच्या टाक्या किंवा पाईपलाईनमध्ये गळती असल्यास ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी. नादुरुस्त नळांचीही दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वाहने, अंगण व रस्ते धुण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. सार्वजनिक ठिकाणी नळ सुरू राहिलेला किंवा पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास नगरपंचायतीस माहिती द्यावी. तसेच पाणी चोरी, अनधिकृत जोडणी किंवा पाण्याचा गैरवापर आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाण्याचा साठा काळजीपूर्वक व नियोजनपूर्वक वापरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, सर्वांच्या सहकार्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळता येईल, असे नगरपंचायत प्रशासनाने म्हटले आहे.“कणकवलीला पाणीटंचाईमुक्त आणि समृद्ध ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा आहे. चला, आजच संकल्प करूया — पाणी वाचवूया, भविष्य घडवूया,” असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.पाणी बचतीसंदर्भात संपर्कासाठी श्री. प्रशांत पिळणकर (मोबाईल : 9420306203) तसेच नगरपंचायत हेल्पलाईन क्रमांक 02367-232007 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












