LIVE UPDATES

देवगड तहसीलदार शीतल जाधव यांनी घेतला दुष्काळनियोजनाचा आढावा

७५० बंधाऱ्यांचे नियोजन ; दसऱ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 18:24 PM
views 38  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार देवगड तालुक्यात उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार शीतल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांचे अधिकारी, नगरपंचायत व पंचायत समिती प्रशासनाच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजना आणि आगामी नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

 यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, पंचायत समिती गटविकास अधिकारी निलेश जगताप, नगरपंचायत मुख्याधिकारी हरिदत्त माने, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य-सदस्या तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत नगरपंचायत व पंचायत समिती प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती तहसीलदार शीतल जाधव यांनी घेतली. प्रशासन, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था व विद्यार्थी, बचत गट,आरोग्य विभाग  नागरिक आणि माध्यमांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करता येईल, असे त्यांनी सांगितले.

देवगड तालुक्यात जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीसाठा वाढविण्यासाठी एकूण २ हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी ७५० बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बंधारे व जलधारा याठिकाणी कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘पाणी मित्र’ नेमण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती दिली जाणार आहे.दुष्काळजन्य परिस्थितीतून देवगड तालुक्याला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार शीतल जाधव यांनी केले. दसऱ्यापूर्वी नियोजित जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर असून, त्यादृष्टीने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.