
नवी दिल्ली : लडाखच्या भौगोलिक, लष्करी आणि सांस्कृतिक दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने या केंद्रशासित प्रदेशातील तब्बल २८ प्रमुख ठिकाणांच्या आणि भौगोलिक वैशिष्ट्यांच्या नावांचे प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आता ही सर्व नावे 'सर्व्हे ऑफ इंडिया'च्या अधिकृत नकाशांवर अधिकृतपणे नोंदवली जाणार आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, भौगोलिक अचूकता आणणे, प्रशासनात सुसूत्रता निर्माण करणे आणि लडाखचा समृद्ध वारसा जपणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोंधळ आणि विसंगती आता इतिहासजमा
यापूर्वी अधिकृत कागदपत्रे, महसुली नोंदी आणि नकाशांमध्ये एकाच ठिकाणाची वेगवेगळी नावे किंवा स्पेलिंग्ज वापरली जात असत. यामुळे प्रशासकीय व लष्करी कामकाजात अनेकदा गोंधळ निर्माण होत असे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे स्पेलिंग्जमधील तफावत दूर होऊन सर्व सरकारी आणि लष्करी नोंदींमध्ये पूर्ण एकवाक्यता येणार आहे.
संस्कृती आणि सामरिक महत्त्वाचा मेळ
या नामांकनात लडाखच्या ऐतिहासिक परंपरा, बौद्ध तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम दिसून येतो.
शिखरे : अतिशा गिरी, कनिष्क पीक, मार्तंड गिरी, जोरावर पीक, रिंचेन झांगपो शाक्यश्री गिरी, मार्पा लोत्सावा री, मिलारेपा कांग्री, शिव री आणि महेश्वर री. (यामध्ये बौद्ध धर्मगुरू आणि भगवान शिवाशी संबंधित नावांचा समावेश आहे.)
पर्वत व खिंडी : कारुण पीर, द्राक कारपो, जोलमोर तसेच चापचिंगल व शचमिर्क या खिंडी.
हिमनद्या व जलस्रोत : पारपिक व स्कमरी हिमनद्या, श्कोर्गा व्हॅली, यांगपा नदी, गुरू रिंपोचे तलाव आणि हॉट स्प्रिंग.
इतर भूभाग: ब्रांग्सा, कुकसेल, देहरा कंपास, गोगरा, कुमारयान पॉईंट, पंगलुंग व शामल लुंगपा.
सीमेवर लष्करी व नकाशाविषयक स्पष्टता वाढणार
'गोगरा' आणि 'हॉट स्प्रिंग' यांसारख्या अतिशय संवेदनशील सीमाभागांतील नोंदींचे प्रमाणीकरण झाल्यामुळे सामरिक आणि लष्करी दृष्टीने नकाशांवरील स्पष्टता अधिक मजबूत होणार आहे.एकंदरीत, या ऐतिहासिक निर्णयामुळे लडाखची भौगोलिक ओळख अधिक मजबूत होणार असून स्थानिक संस्कृतीला अधिकृत नकाशांवर सन्मानाचे स्थान मिळाले आहे.














