
दिवेआगर : पुण्यातील आळंदी येथील एका महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी परिसरातील कॉलेजचे काही विद्यार्थी पर्यटनासाठी आणि फिरण्यासाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्राचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात वाहून गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला.
दुर्देवी घटनेत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यश किरण वानखेडे (वय १६), सोहम तुकाराम भांडवलकर (वय १६), तन्मय दत्तात्रय वहिले (वय १६), कौस्तुभ संदीप दोंड, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, प्रणव रामदास बनसोडे, सुमित भारत अहिरे यांचा समावेश आहे.
स्थानिक वॉटर स्पोर्ट्स मालकाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली. दिवेआगर येथील 'भाऊ मारुती साळूंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्स'चे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोधमोहीम राबवली. आपल्या जिवाची पर्वा न करता भाऊ साळूंखे व त्यांच्या टीमने अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
पोलीस आणि प्रशासनाची घटनास्थळी धाव
दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पोलीस टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले आहेत. या दुर्दैवी घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन पर्यटनाच्या काळात घडलेल्या या दुःखद घटनेने दिवेआगर व परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










