LIVE UPDATES

बँक मॅनेजर आत्महत्याप्रकरणी संशयितांना अटकपूर्व जामीन

जिल्हा बँकेच्या मुणगे शाखेत २८ लाखांचा होता अपहार ; दोन्ही संशयित सहा महिन्यांपासून फरार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 06, 2026 18:42 PM
views 103  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मुणगे येथील शाखा व्यवस्थापक अविनाश काशिराम तळवडेकर यांचा आर्थिक व मानसिक छळ करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले फरार संशयित अमोल नंदकिशोर कांदळगावकर व सुहास नारायण मालंडकर या दोघांनाही मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी संशयित आरोपींच्यावतीने देवगड येथील अॅड. कौस्तुभ मराठे यांनी सर्कीट बेंचसमोर यशस्वी युक्तीवाद केला. त्यांना याकामी अॅड. मिहीर मोंडकर (सावंतवाडी) यांनी सहाय्य केले.

सप्टेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँक, शाखा मुणगेमधील बँक खातेधारकांच्या खात्यांमधील तसेच बँकेतील एफ. डी. च्या रकमा परस्पर वळत्या करुन २७ लाख ७५ हजार २०१ रूपयांचा अपहार करण्यात आला होता.

 सदर अपहाराची संपूर्ण रक्कम संशयित आरोपींना देण्यात आली होती. सदर रक्कमेवर भरमसाट परतावा देण्याचे आमिष संशयित आरोपींकडून बँक मॅनेजर अविनाश तळवडेकर यांना देण्यात आले होते. तथापि त्यांनी वारंवार मागणी करूनही सदर खातधारकांचे पैस संशयित आरोपींनी परत केले नव्हते. संबंधित शाखेचे शाखा व्यवस्थापक अविनाश तळवडेकर यांनी आर्थिक फसवणुकीमुळे मानसिक तणावाखाली येऊन २५ नोव्हेंबर २०२५ राजी आरे येथील कौल कारखान्यानजीकच्या तलावात उडी मारुन आत्महत्या कली होती. यावेळेस अविनाश तळवडेकर यांनी मोटरसायकलच्या डिकीमध्ये संशयित आरोपींचे नाव असलेली चिट्ठी लिहून ठेवली होती.मयताने लिहून ठेवलेल्या

चिठ्ठीतून हा अपहार उघडकीस आला

संशयित आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३ (५) प्रमाणे देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरारी होते. देवगड पोलीस संशयितांचा शोध घेत होते. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींचा जामीन नामंजूर करून फेटाळला होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचसमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही संशयित आरोपींना देण्यात आलेला अंतरिम अटकपूर्व जामीन कायम करण्यात आला आहे.