LIVE UPDATES

कोकणसाद IMPACT ; उद्योगमंत्र्यांनी घेतली आडाळीतील अवैध उत्खननाची दखल

मागितला अहवाल ; शिवसैनिकांनी दिली MIDCत धडक
Edited by: लवू परब
Published on: May 28, 2026 16:07 PM
views 226  views

दोडामार्ग : तालुक्यातील आडाळी एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात मायनिंग सदृश्य माती चोरी होत असल्याचे वृत्त कोकणसादच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे शिवसेना शिष्ठमंडळाने घटनास्थळी धडक देत पाहणी केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांना  याबाबत कल्पना दिली असता अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नव्हती. त्यामुळे येत्या शनिवारी दोडामार्गच्या शिवसेना शिष्टमंडळाला रत्नागिरीत बैठकीसाठी बोलावलं आहे. आडाळीत भेट देऊन इथला अहवाल त्यांनी मागितला आहे. तसेच या अवैध तस्करीशी शिंदे शिवसेनाचा काहीही संबंध नाही. उलट या बेकादेशीर सर्व गोष्टी सत्तेचा वापर करून आम्ही हाणून पाडू, अशी माहिती शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख व उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी दिली.

आडाळी एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त माती उत्खनन करून चोरली जात असल्याचे वृत्त कोकणसादने दिले होते‌. याची दखल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. या अनुषंगाने आज दोडामार्ग शिवसेना शिष्टमंडळाने आडाळी एमआयडीसीमध्ये जात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात माती काढून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी उपसभापती गणेश प्रसाद गवस यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोनद्वारे संपर्क करून सर्व घटना सांगितली. यावेळी मंत्री सामंत यांनी दोडामार्ग शिवसेना शिष्ट मंडळाला शनिवारी या संदर्भात बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. या संदर्भात इथल्या अधिकारी वर्गाने मला कोणतीही कल्पना दिलेली नाही आहे, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केल्याचे श्री. गवस यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर,  जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, उपतालुका प्रमुख बाबाजी देसाई, युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस, रामदास मेस्त्री विभाग प्रमुख, मणेरी झरेबाबर सरपंच अनिल शेटकर,  पिकुळे सरपंच आप्पा गवस,  विशांत तळवडेकर, माजी सरपंच मणेरी, गुरूदास सावंत ग्रामपंचायत सदस्य सासोली, सुनील गवस उपसरपंच मांगेली आदी उपस्थित होते. 

दोडामार्ग प्रशासन झोपलं का? : गणेशप्रसाद गवस

आडाळी एमआयडीसीमध्ये बेकायदेशीर माती उत्खनन व वाहतूक सूरु असताना इथल्या प्रशासनाला दिसले नाही का ? यावर काय कारवाई केली ? महसूल प्रशासनाचा वचक नसल्यानेच हे सर्व सुरु असल्याची टीका उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी केली. एमआयडीसीत उद्योगधंद्यांच्या नावाखाली चुकीचे उद्योग सुरु आहेत. या सर्व गोष्टीची पुराव्यांनीशी सर्व अहवाल मंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर करणार अस त्यांनी स्पष्ट केले.