
महाड : रोजगाराच्या निमित्ताने महाडसह कोकणातून वसई, नालासोपारा, विरार आणि पालघर परिसरात स्थलांतरित झालेल्या शेकडो कोकणवासीयांना सध्या प्रवासाच्या भीषण रेल्वे वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत घरांचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेकांनी पश्चिम रेल्वेवरील नायगाव, वसई, विरार डहाणू पट्ट्यात आपले वास्तव्य हलवले आहे. मात्र, या भागातून कोकणात ये-जा करण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मध्य रेल्वेचे दादर, पनवेल किंवा दिवा स्थानक गाठावे लागते. मुख्यत्वे नायगाव वसई विरार पालघर - डहाणू पट्ट्यातील शेकडो प्रवासी पनवेल स्थानकातून जोडणाऱ्या गाड्यांचा वापर करतात. मात्र, योग्य समन्वयाच्या अभावामुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा वाया जात आहे.
गावाहून परतताना महाड तालुक्यातील सापे-वामने, विन्हेरे, वीर रेल्वे स्टेशन परिसरासह कोकणवासीय प्रामुख्याने ५०१०६ ‘सावंतवाडी रोड - दिवा पॅसेंजर’वर अवलंबून असतात. वेळापत्रकानुसार ही गाडी सायंकाळी ७:०५ वाजता पनवेल, तर ८:१० च्या सुमारास दिव्याला पोहोचणे अपेक्षित असते.
मात्र, कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावरील तांत्रिक अडचणी आणि गाड्यांच्या क्रॉसिंगमुळे ही ट्रेन बहुतांश वेळा तासनतास उशिराने धावते. सावंतवाडी पॅसेंजर’ वेळेत न पोहोचल्याने पनवेलवरून पश्चिम भागात रेल्वेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पुढील सर्व नियोजित रेल्वे कनेक्शन पूर्णपणे विस्कळीत होते.
दुसरीकडे, मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी ६९१६१ ‘पनवेल - डहाणू रोड मेमू’ ही गाडी पनवेल स्थानकातून सायंकाळी ६:५० वाजता सुटते. म्हणजेच ही मेमू गाडी सावंतवाडी पॅसेंजर पनवेलला पोहोचण्याच्या १५ मिनिटे आधीच निघून जाते. त्यातच पॅसेंजरच्या नेहमीच्या विलंबामुळे डहाणुकडे जाणाऱ्या प्रवाशांची ही एकमेव सोयीची गाडी हमखास चुकते. परिणामी, प्रवाशांना दिव्याहून दादर किंवा पनवेल-कुर्ला-दादर असा ३ ते ४ टप्प्यांत लोकलचा वळसा घालावा लागतो. हातात सामान, सोबत वृद्ध आणि लहान मुले असताना ऐन गर्दीत गाड्या बदलताना प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून सावंतवाडी-दिवा पॅसेंजर पनवेलला आल्यानंतरच ‘पनवेल - डहाणू रोड मेमू’ सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने आपापसातील समन्वय वाढवून ६९१६१ पनवेल-डहाणू मेमूच्या वेळेत १५ ते २० मिनिटांचा बदल करावा, तसेच दिवा व पनवेल स्थानकातून पालघर-डहाणूसाठी अतिरिक्त मेमू फेऱ्या सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी जोर धरत आहे. आता रेल्वे प्रशासन यावर कधी निर्णय घेणार, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रवाशांची मागणी आणि वस्तुस्थिती
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर (५०१०६) ही गाडी ६१६ किलोमीटरचा प्रवास करत एकूण ४९ स्थानकांवर थांबते आणि तांत्रिक कारणांमुळे बहुतांश वेळा उशिराने धावते. दुसरीकडे, ६९१६१ पनवेल-डहाणू रोड मेमू ही गाडी सायंकाळी ६:५० वाजता सुटून २० स्थानकांवर सेवा देते. या दोन्ही गाड्यांच्या वेळेत ताळमेळ नसल्याने प्रवाशांची मेमू चुकते. त्यामुळे सावंतवाडी पॅसेंजर पनवेलला आल्यावरच मेमूची वेळ १५-२० मिनिटांनी पुढे ढकलून ती सोडावी आणि दिवा तसेच पनवेल स्थानकातून पालघर-डहाणूसाठी अतिरिक्त फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मुख्य मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
"डहाणू मेमू सुटण्याची वेळ सावंतवाडी पॅसेंजर पनवेलला पोहोचण्याच्या १५ मिनिटे आधीची आहे. त्यातच पॅसेंजर गाडी उशिरा आल्यामुळे ही मेमू चुकते आणि संपूर्ण कुटुंबासह दादर-कुर्ला मार्गे वळसा घालत घरी जाण्यास थेट मध्यरात्र होते. रेल्वे प्रशासनाने मेमूची वेळ केवळ १५ ते २० मिनिटे पुढे ढकलल्यास किंवा दोन्ही गाड्यांच्या वेळेत ताळमेळ घातल्यास हजारो प्रवाशांचा हा रोजचा मनस्ताप कायमचा टळू शकतो."
बबन धाडवे (प्रवासी, नालासोपारा)
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










