LIVE UPDATES

Kudal News : कुडाळमध्ये अतिक्रमणावरील कारवाईदरम्यान मोठा राडा

'सिंधुदुर्गच्या राजा'बाबतच्या वक्तव्याने वातावरण तापले : रात्री ११ नंतरही नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर 'ऑन फील्ड'
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 11:58 AM
views 419  views

कुडाळ : कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेतील अनधिकृत स्टॉल आणि अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा पडत असतानाच या कारवाईला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. निष्कासनाची कारवाई सुरू असताना अभय शिरसाट यांनी 'सिंधुदुर्ग चा राजा' या गणेशोत्सवाचा मंडपदेखील अनधिकृत असल्याचे सांगत त्यावरही कारवाई करण्याची थेट मागणी केली. या वक्तव्यानंतर स्थानिक नागरिक, भाविक आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

गणेशोत्सव हा संपूर्ण कोकणचा प्राण आणि अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. त्यातच अनेक वर्षांची परंपरा असलेल्या 'सिंधुदुर्गचा राजा' या श्रद्धास्थानाबाबत असे वक्तव्य केल्याने वातावरण चांगलेच तापले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून शिंदेसेना कमालीची आक्रमक झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही या प्रकाराबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या मोक्याच्या जागेत उभारण्यात आलेले अनेक अनधिकृत स्टॉल हटवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर - शिरवलकर स्वतः 'ऑन फिल्ड' उतरल्या होत्या. रात्री ११ वाजल्यानंतरही त्या प्रत्यक्ष घटनास्थळी ठामपणे उपस्थित राहून कारवाईवर लक्ष ठेवून होत्या. त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्यासह पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

आरोग्य विभागाचे अधिकारी, नगरपंचायत कर्मचारी आणि कडक पोलीस बंदोबस्तात ही धडक मोहीम मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती. एका बाजूला अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू असताना, दुसरीकडे शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला तणाव पाहता घटनास्थळी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.