
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त व मांग-गारुडी समाजाचे जेष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते शामराव सकट (वय 85) यांचे 3 सप्टेंबर रोजी सिध्दार्थ नगर कणकवली येथे दुःखद निधन झाले. हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या, मांग-गारुडी, भटक्या-विमुक्त समाजाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर करून त्यांना न्याय, संरक्षण व हक्क मिळवून देण्याचे मोलाचे कार्य कै. शामराव सकट यांनी केले. त्यांनी आयुष्यभर उपेक्षित समाजाच्या न्यायासाठी संघर्ष केला.
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. जिल्ह्यातील प्रत्येक जन-लढ्यात, मोर्चात, आंदोलनात त्यांचा कायम पुढाकार राहिला आहे. अन्यायाविरुद्ध ते नेहमीच ठामपणे उभे राहायचे. त्यांच्या जाण्याने पुरोगामी व आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना ॲड. सुदीप कांबळे व नगरसेवक लुकेश कांबळे यांनी व्यक्त केल्या आहेत. सामाजिक चळवळीतून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.











