LIVE UPDATES

मराठी शाळा वाचवण्यासाठी जांभवडे ग्रामपंचायतीचा क्रांतीकारी निर्णय

नवीन प्रवेशावर ११ हजार रुपयांची मदत, घरपट्टी माफ आणि मोफत शेती साहित्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 13:05 PM
views 38  views

कुडाळ : सिंधूदूर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असताना, कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावाने शिक्षण क्षेत्रात एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. गावातील पाच मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सरपंच अमित मढव, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत एक अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. यापुढे गावातील मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला व त्याच्या कुटुंबाला भरघोस आर्थिक व सामाजिक सवलती दिल्या जाणार आहेत.

मराठी प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन म्हणून जांभवडे ग्रामपंचायतीच्या 'ग्राम निधी'मधून ५ हजारांची रोख मदत दिली जाईल. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या घराची वार्षिक ग्रामपंचायत घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

गावातील बहुतांश कुटुंबे शेतीवर आधारित असल्याने, पाल्याला मराठी शाळेत पाठवणाऱ्या पालकांना शेतीसाठी लागणारे दर्जेदार बी-बियाणे आणि उपयुक्त शेती अवजारे ग्रामपंचायतीतर्फे मोफत दिले जातील. १ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणारा ६ हजार रुपयांचा आर्थिक प्रवास भत्ता मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्वतः पाठपुरावा करेल.

ग्रामपंचायतीचे ५ हजार आणि शासकीय योजनेचे ६ हजार रुपये मिळून एका विद्यार्थ्याच्या प्रवेशामागे तब्बल ११ हजार रुपयांचा आर्थिक लाभ पालकांना होणार असल्याचे सरपंच अमित मढव यांनी सांगितले.

केवळ आर्थिक सवलती देऊन न थांबता शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावरही जांभवडे ग्रामपंचायतीने विशेष भर दिला आहे. इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल लक्षात घेऊन गावातील सर्व पाचही मराठी शाळांमध्ये 'सेमी-इंग्रजी' माध्यम सुरू करण्याचा मानस आहे. यामुळे इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकवले जातील.

याविषयी माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य शाहू धोंडू कदम म्हणाले, "पालकांची इंग्रजी शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी शाळा डिजिटल करण्यासोबतच सेमी-इंग्रजी वर्ग सुरू केले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे."

पटसंख्येच्या अभावी राज्यभरात अनेक मराठी शाळा बंद पडत असताना, केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्थानिक स्वराज्य संस्थेने आणि ग्रामस्थांनी स्वतःच्या निधीतून शाळा वाचवण्यासाठी उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे. जांभवडे गावाचा हा पॅटर्न भविष्यात राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल.