LIVE UPDATES

Sindhudurg news : 9 सप्टेंबरला सावंतवाडीत भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 19:15 PM
views 43  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक 9 सप्टेंबरला सावंतवाडी येथील नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यकारणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. या कार्यकारणीला जवळपास 400 हून अधिक कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हाध्यक्ष श्री. सावंत म्हणाले, प्रदेश कार्यकारिणी बैठक पुणे येथे नुकतीच पार पडली. चार हजारहून अधिक कार्यकर्ते या कार्यकारणीला उपस्थित होते. आता सावंतवाडी येथे होणाऱ्या या कार्यकारिणीला सुद्धा मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यकारिणीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांच्यासह जिल्हा कार्यकारणीचे सदस्य मंडळ, कार्यकारणी पदाधिकारी, जनप्रतिनिधी असे पदाधिकारी उपस्थित असणार आहे. या कार्यकारणी दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून केलेल्या विविध विकासात्मक कामांचा अभिनंदन ठराव घेतला जाणार आहे. त्यानंतर राजकीय प्रस्ताव सादर होईल असे ते म्हणाले.

तर, मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी २५ वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल महिनाभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार असून त्या संदर्भातही या कार्यकारणीमध्ये नियोजन केले जाणार आहे. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत हे अभियान असणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा चिटणीस महेश धुरी, सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक रवी मडगावकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, तालुका मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ले तालुका मंडल अध्यक्ष पप्पू परब, शहर मंडल अध्यक्ष तथा नगरपंचायत सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, दिलीप भालेकर, सागर ढोकरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.