LIVE UPDATES

'रत्नागिरी ८' भात बियाणांमुळे रानबांबुळीत शेतकरी अडचणीत

मुदतीपूर्वीच फुलोरा आल्याने पंचनामे व भरपाईची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 13:54 PM
views 39  views

कुडाळ : चालू खरीप हंगामात पेरणी केलेल्या 'रत्नागिरी ८' या भात वाणामध्ये मुदतीपूर्वीच फुलोरा आल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे रानबांबुळी (ता. कुडाळ) येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, कृषी विभागाने तातडीने शेतात येऊन पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी रानबांबुळीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

रानबांबुळी गावातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी 'महाॲग्री सिडस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीचे 'रत्नागिरी ८' हे भात बियाणे खरेदी केले होते. हे बियाणे कसाल येथील 'काव्या कृषी केंद्र' आणि पणदूर येथील 'काजवा शेतकरी सेवा संघ' यांच्याकडून घेण्यात आले होते.

सामान्यतः 'रत्नागिरी ८' या भात वाणाला पेरणीनंतर साधारण १३५ ते १४० दिवसांनी फुलोरा येतो. मात्र, या बियाण्यामध्ये अवघ्या ९० दिवसांतच फुलोरा आल्याचे दिसून आले आहे. वेळेआधीच फुलोरा आल्यामुळे भाताची वाढ अपूर्ण राहिली असून, उत्पन्नाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे बियाणांमधील दोषांमुळे सर्व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन भात पिकाची पाहणी व चर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य अमित भोगले, तालुका कृषी अधिकारी, बियाणे कंपनीचे अधिकारी, बियाणे विक्रेते, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गावडे, रवळनाथ परब यांच्यासह गावातील ग्रामस्थ व बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तात्काळ पंचनाम्याची मागणी

कृषी विभाग आणि संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रानबांबुळीतील बाधित शेतांवर भेट देऊन पिकांचे तातडीने पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी, अशी ठाम मागणी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी केली आहे.