कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेला गती; १०८ किमी मार्गाचा डीपीआर अखेर तयार

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला मिळालं मोठं यश
Edited by: संदीप देसाई
Published on: March 25, 2026 22:11 PM
views 36  views

दिल्ली : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी या १०८ किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अखेर तयार झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवं यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

या प्रकल्पासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचा सातत्यपूर्ण केंद्रस्तरीय पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाबाबत घोषणा करून प्रशासनाला वेग देण्याचे निर्देश दिले होते.

डीपीआर तयार झाल्याने आता प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियांना वेग आला असून पुढील टप्प्यात राज्य सरकार, संबंधित विभाग आणि विविध भागधारकांकडून आवश्यक सल्लामसलत केली जाणार आहे. तसेच नीती आयोग आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मूल्यांकन व अंतिम मंजुरी घेणे आवश्यक आहे.

हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकणातील मालवाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी अधिक सोयीस्कर, जलद आणि थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे दोन्ही भागांतील आर्थिक देवाणघेवाण वाढून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

सध्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुमारे ३० रेल्वेगाड्या धावत असून मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली आणि अहमदाबादसारख्या प्रमुख शहरांशी जोडणी आहे. नव्या प्रकल्पामुळे ही कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

दरम्यान, प्रकल्पाची अंमलबजावणी जमीन अधिग्रहण, वन विभागाच्या मंजुरी, अतिक्रमण हटविणे आणि निधी उपलब्धता या तांत्रिक बाबींवर अवलंबून राहणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रक्रियांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, कोकण–पश्चिम महाराष्ट्र जोडणीच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.