ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे...सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डीवचलं !

उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेला चक्रवाढ व्याजासकट उत्तर देणार : अंधारे
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 02, 2022 11:57 AM
views 403  views

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांना डिवचलंही. तसेच आपण केलेली आजवरची सर्व आंदोलने यशस्वी झाली आहेत. इतर पक्षांपेक्षा आपल्या आंदोलनाच्या यशाचा रेट सर्वाधिक आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.


मुलुंडमध्ये काल महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या खणखणीत भाषणातून राज ठाकरे यांचा समाचार घेतानाच त्यांच्या आंदोलनाची खिल्लीही उडवली. राज ठाकरे यांचे टोलचे आंदोलन म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होतं. सब मॅनेज किया. वडापाव गाडी, गरीबांवर जोर जबर दाखवत आहेत. पण इमारतीत व्यवसाय करणाऱ्यांवर कधी जोर दाखवणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.


मनसे धारावी पॅटनबाबत का बोलत नाही? अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला. उद्धव ठाकरे यांच्या आजारावर कोणी नाटक करत असेल तर त्याला चक्रवाढ  व्याजासकट उत्तर दिले जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.