
वेंगुर्ले : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव शेटकरवाडी येथील रहिवासी मनीष गुंडू आजगावकर (वय ३२) या युवकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे विहिरीत आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.आजगाव शेटकरवाडी येथील रहिवासी मनीष आजगावकर हा घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा नातेवाईकांमार्फत शोध सुरू होता. दरम्यान रविवारी सकाळी तो सावंतवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्याच्या नातेवाईकांनी सावंतवाडी येथे त्याला गाठले. दरम्यान मनीष हा आजगाव येथे घरी जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे तो मामाकडे तुळस येथे आला होता. मात्र सायंकाळी तो येथील घराच्या बाजूस असलेल्या विहिरीत मृतावस्थेत आढळून आला.
मानसिक संतुलन बिघडून त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडून मयत झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पीएसआय श्री.कांबळे, पोलीस हवालदार योगेश सराफदार, पोलीस कॉ. कलगोंडा यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील प्रक्रिया केली. याबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सराफदार हे पुढील तपास करीत आहेत. त्या युवकाच्या पश्चात आई, वडील, मामा असा परिवार आहे.










