LIVE UPDATES

'आई, मला जगण्यात रस नाही' म्हणत उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडीलांनीही गमावला जीव

Chhatrapati Sambhajinagar boy mountain tragedy : घटनास्थळी मदतीसाठी गावकरी आणि सरपंचही तिथे पोहोचले. जवळपास तीन तास सर्वांनी कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरले.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 14:02 PM
views 372  views

छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरातील 'खवड्या टेकडी'वर एक दुख:द घटना घडली आहे. १८ वर्षीय कुणाल चांदवडे काही कारणास्तव अस्वस्थ होता आणि त्या दिवशी सकाळी खवड्या टेकडीवर गेला होता. तो तिथे असल्याची माहिती मिळताच, त्याचे आई-वडील त्याला समजावून घरी परत आणण्याच्या आशेने घटनास्थळी धावले. मात्र, डोंगरावरुन कुणालने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करताना त्याला वाचवताना त्याच्या आई-वडीलांचाही दुर्देवी मृत्यू झाला.

यावेळी घटनास्थळी मदतीसाठी गावकरी आणि सरपंचही तिथे पोहोचले. जवळपास तीन तास सर्वांनी कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आयफोन कुणालने खरेदी केला होता. त्याचा हप्ता भरण्यासाठी कुटुंबाकडे तो पैशांची मागणी करीत होता. यावरुन कुणालचा त्याच्या वडीलांसोबत वाद झाला होता. कुणाल सकाळी 10 वाजता 'खवड्या टेकडी'वर आला. तो आत्महत्या करण्यासाठी आल्याचे समजताच त्याचे आई-वडीलही तेथे त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. आसपासच्या गावांतील रहिवासी आणि सरपंच तिथे उपस्थित होते. 

दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाची पथकेही घटनास्थळी दाखल झाली होती आणि कुणालला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. कुटुंबाने त्याच्याशी संवाद साधण्याचे सतत प्रयत्न करूनही कोणालाही यश आले नाही. समजूत काढण्याचे प्रयत्न दीर्घकाळ चालल्यानंतर, कुणालचे वडील मुरलीधर टेकडीवर जिथे मुलगा होता तिथे वर चढले आणि त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नादरम्यान त्यांनी कुणालला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही टेकडीवरून खाली पडले. आपला मुलगा आणि पती यांच्यासोबत घडलेली ही घटना पाहून कुणालची आई संगीता यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनीही टेकडीवरून उडी मारली आणि त्यात त्यांचाही मृत्यू झाला. 

हे दृश्य पाहून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह तिथे उपस्थित असलेले सर्वजण हादरून गेले. या अचानक घडलेल्या शोकांतिकेमुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आणि भयावह वातावरण निर्माण झाले. कुणाल चांदवडे १८ वर्षांचा होता; त्याच्या पालकांची नावे मुरलीधर आणि संगीता अशी होती आणि हे कुटुंब सातारा परिसरात राहत होते. या घटनेनंतर पोलिसांनी कुटुंबातील इतर सदस्यांशी संपर्क साधला आहे.