
कणकवली : कणकवली–हळवल फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या पोचमार्गाच्या कामाला अखेर वेग आला आहे. सुमारे २०१४ पासून उड्डाणपूल बांधून पूर्ण असूनही पोचमार्गाअभावी हा पूल वापराविना पडून होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल विभागाकडे थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक बाधित रहिवाशांची बैठक घेतली होती. या बैठकीत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या पोचमार्गाच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. बागुल यांनी कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या कार्यालयात जाऊन पोचमार्गासाठी थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
भूसंपादनासाठी चार कोटींची तरतूद
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ७५ लाख रुपये अनामत रक्कम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनासाठी महसूल विभागाकडे जमा केली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया आता प्रत्यक्ष मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
केंद्रीय मार्ग निधीतूनही २० कोटींच्या निधीची शिफारस
दरम्यान, या पोचमार्गाच्या कामासाठी खासदार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशान्वये अर्थसंकल्पात भूसंपादनाकरिता सुमारे चार कोटी तरतूद करण्यात आली आहे
75 लक्ष भूसंपादनाकरिता महसूल विभागाला अनामत रक्कम जमा
नारायण राणे यांनी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिफारस केली आहे. गेली तब्बल १४ वर्षे वापराविना पडून असलेल्या हळवल फाट्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या पोचमार्गाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव सादर झाल्याने पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन पोचमार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१४ वर्षांची प्रतीक्षा संपण्याच्या दिशेने!
उड्डाणपूल बांधूनही पोचमार्गाअभावी नागरिकांना त्याचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी होती. आता शासनस्तरावरून निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अनामत रक्कम आणि प्रस्ताव सादर झाल्याने अखेर या रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. त्यामुळे हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा पोचमार्ग लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे












