
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबई जिल्ह्यातर्फे भटवाडी घाटकोपर येथे निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकरांची मॉर्निंग वॉक दरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याला तेरा वर्षे झाली. त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्यात. पोलिसांनी खुनी पकडले. पण अद्याप पर्यत सूत्रधार मोकाटच आहेत. माणूस मारून विचार संपत नाही. हा संदेश देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला.
या मॉर्निंग वॉकमध्ये मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, विविध उपक्रम विभाग कार्यवाह संदेश बालगुडे, सोशल मिडिया विभाग कार्यवाह प्रवीण जावळे, घाटकोपर शाखा प्रधान सचिव प्रफुल्ल रणदिवे, राज्य प्रधान सचिव विजय परब, मुंबई अंनिसचे सर्व कार्यकर्ते तसेच समविचारी साथी टीम व्हिजनचे संदेश भिंगार्डे, नवनिर्मिती संस्थेचे नंदकुमार जाधव, मूलभूत अधिकार संघटनाचे दिनेश राणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दादर घाटकोपर कुर्ला दहिसर शाखेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
मॉर्निंग वॉक दरम्यान पोस्टर प्रदर्शन व फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर अश्या घोषणा देण्यात आल्या. दाभोलकरांच्या खुनातील आरोपी सचिन अंदुरे याला हायकोर्टाने जामीन दिल्याच्या घटनेचा निषेध सुद्धा करण्यात आला. सुरुवातीला मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश यांनी दाभोळकर खून खटला आढावा घेतला. सूत्रधार का सापडत नाही? म्हणून प्रश्न उपस्थित केला. जोपर्यंत सूत्रधार सापडत नाही तोपर्यंत सविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्ही सरकारला प्रश्न विचारत राहू असे सांगितले. या निर्भय मॉर्निंग वॉक मध्ये भारत देशाला आणि स्वतःला साक्षी ठेवून हिंसेविरुद्ध मानवतेसाठी प्रतिज्ञा राज्य निमंत्रित सदस्य नंदकिशोर तळाशीलकर यांनी सर्वाना दिली.














