
मुंबई: गेटवे परिसरातील लाकडी बोटी इलेक्ट्रिक करण्यासाठी मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या समवेत बैठक पार पडली.
मुंबईतील गेटवे परिसरात ९७ लायसन्सधारक लाकडी बोटी कार्यरत असून या बोटी डिझेलवर चालत असल्याने बोट मालकांना महिन्याला सुमारे १ लाख रुपयांपर्यंत इंधन खर्च करावा लागतो. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे तसेच बोट मालकांचा खर्च कमी करणे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि हरित पर्यावरणासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील प्रवासी व मच्छिमारी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक बोटींची किंमत अंदाजे २.५ कोटी ते ६ कोटी रुपयांपर्यंत असल्याने मत्स्य संस्था, खासगी बोट मालक, वैयक्तिक लाभार्थी आणि असोसिएशन यांच्यासाठी कमी व्याजदरातील विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई बँकेने स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, या उपक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात २५ लाभार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यापैकी पहिल्या ५ जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेकडून विशेष पॉलिसी तयार करून ती आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असा विश्वास यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.














