
पणजी : पत्रकारितेचे बदलते टप्पे आपणाला माहित असून येणारी आव्हानं आपण लक्षात घेतली पाहिजेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यासमोर टीकून राहणं फार महत्त्वाचं आहे. आव्हानांचा मुकाबला करून कृत्रिम बुद्धिमत्तेसमोर टीकताना स्वतःच्या मेंदूला कार्यक्षमतेने चालवण्याची गरज आहे. आपला मेंदू सतत कार्यक्षम ठेवल्यास बदल्यात स्वरूपांची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे मत गोवा राज्याचे माजी माहिती आयुक्त तथा कोकणसादचे संपादक-संचालक संजय ढवळीकर यांनी व्यक्त केले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ''पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हानं'' या विषयावर आयोजित परिसंवादात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री. ढवळीकर म्हणाले, पत्रकारितेला मोठा वारसा असून मानवाच्या उत्पत्तीपासून तीचा उगम आढळतो. पत्रकार हे नारद मुनींचे वंशज असून माहिती देण्याचे काम आपण करतो. २५० वर्षांपूर्वी मुद्रीत स्वरूपात ही पत्रकारिता सुरू झाली. नियतकालिक, दैनिक, रेडिओ, दुरदर्शन, इलेक्ट्रिक मिडिया, डिजिटल मिडिया, स्मार्ट फोनमुळे सिटीझन जर्नालिझम पासून सोशल मिडिया ते आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आपण येऊन पोहचलो आहोत. 'एआय' काय करू शकते ? याचा अनुभव आपल्याला आला आहे. या प्रत्येक टप्प्यावर आव्हानं असताना टीकाव धरून ठेवण आवश्यक आहे. या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे. अर्थकारण देखील यात महत्त्वाच ठरते. वेगाशी स्पर्धा, आर्थिक बळ अन् कल्पकतेच्या जोरावर आपण आव्हानांसमोर टिकू शकतो. तसेच फेक न्यूजच्या काळात बातमीची शहानिशा करून विश्वासाहर्ता जपण तेवढच आवश्यक आहे. स्पर्धेच्या गोंधळात फेक न्यूजच प्रमाण वाढल आहे. बदलत्या मिडियाचे शिक्षण देखील आवश्यक आहे. तसेच पत्रकारांची सुरक्षा देखील तेवढीच आवश्यक आहे. मोठे धोके आपणाला स्वीकारावे लागतात. तसेच आपलं शारीरिक आरोग्य देखील आपण जपलं पाहिजे, अशा अनेक आव्हानातून मार्ग काढताना वास्तवाच भान राखून दर्जा टिकवणं, योग्य मार्गाने आर्थिक बळ मिळवून दिर्घकाळ टिकणं, मजकुराचा दर्जा टिकवणं, युरोप-अमेरिकेप्रमाणे दर्जात्मक मजकूर विकण्याचा प्रयत्न, तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करत सामाजिक दृष्टीकोनातून पत्रकारिता केल्यास ती टिकेल अन् सक्षमपणे चालेल. योग्य मार्गाने गेल्यास समाज आपणाला साथ देतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोव्याचे खासदार सदानंद तानावडे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा कोकणसाद LIVE - दै. कोकणसाद चे मुख्य संपादक सागर चव्हाण आदी उपस्थित होते.














