LIVE UPDATES

मोठी बातमी | मराठा उद्योजकांसाठी कर्जमर्यादा वाढवणार !

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची सिंधुदुर्गात घोषणा !
Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 27, 2023 18:07 PM
views 691  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीयकृत बॅकांमधून महामंडळाच्या योजनेतर्गत कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. मंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम झाले. दहा लाखापर्यंतचे कर्ज घेऊन ज्या मराठा समाजातील उद्योजकांनी यशस्वी उद्योग केले व बँकेची परतफेड केली त्यांना पंधरा लाखापर्यंतचे कर्ज देणारी या महामंडळाची योजना लवकरच जाहीर करू, अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.


जिल्हा बँक सभागृहात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळंचे अध्यक्ष नरेंद्र पाटील बोलत  होते. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच सर्व संचालक आणि लाभार्थी उपस्थित होते.


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर मराठा समाज असून देखील या जिल्ह्यातून कमी प्रस्ताव का येतात, असा प्रश्न उपस्थित करून नरेंद्र पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आर्थिक विकासावर आरक्षण मिळावे, ही अण्णासाहेबांची इच्छा होती. म्हणूनच भविष्यात मराठा समाजाला प्रवाहात आणण्यासाठी काय काम करता येईल, यासाठी प्रयत्न केले गेले. या महामंडळाचे उद्गाते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मराठा समाजाला प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.


राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाजाला जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यकर्त्यांनी सामाजिक चळवळीत काम करताना राजकीय जोडे बाहेर ठेवून काम करावे, हे फडणवीस यांचं म्हणणं होतं. तसेच केंद्रीय मंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला या प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठं काम झालेलं आहे. या सगळ्यांचा विचार करून पुढील काळात लाभार्थ्यांना व्याज परतावा सात दिवसात होईल, याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अगोदर वेळेत परतावा केलेला आहे त्यांना पंधरा लाख योजनेचा लाभ देण्यासाठी देखील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

 

व्यवसाय वाढीसाठी मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे, हे आवश्यक असताना राष्ट्रीयकृत बँका मात्र या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी खूपच दिरंगाई करतात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गातील तरुणांच्या आयुष्यात एक परिवर्तन निश्चितच होईल. या योजनेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असू.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे,  मात्र येथे प्रस्ताव फार कमी प्रमाणात येतात. ते भविष्यात वाढले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. आपण घरी बसून काम करणारा मुख्यमंत्री बघितला आणि काम व्हावं म्हणून सर्वत्र फिरणारे नरेंद्र पाटीलही बघितले.  त्यामुळे भविष्यात निश्चितच मराठा तरुणांना संधी मिळेल.


प्रास्ताविक जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. यावेळी या योजनेचा लाभ घेतलेल्या अजित जामदार या टिशू पेपर बनविणाऱ्या तरुणाने तसेच रुक्मिणी परब माडखोल, शंकर परब,अभिषेक राउळ, पल्लवी परब, श्री. काकतकर, सुरेश नाईक या तरुणांनी आपले अनुभव सांगितले. या योजनेअंतर्गत जिल्हा बँकेने आपल्याला कर्ज पुरवठा केला म्हणून जिल्हा बँकेचे आभार मानले.