
- आज आहे शेवटचा दिवस
सिंधुदुर्ग : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एक अर्ज भारतीय जनता पक्ष उमेदवार म्हणून तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अतुल काळसेकर यांनी दोन अर्ज घेतल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय आणि अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच काळसेकर यांनी पर्यायी तयारी केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी निश्चित होते आणि कोणता अर्ज दाखल केला जातो, याकडे संपूर्ण कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














