
मातीची होतेय खुलेआम चोरी !
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी मंजूर होऊन तब्बल १३ वर्ष झाली. मात्र, अद्याप इथं उद्योग काही आले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यासाठी विरोधकांच्या सोबत सत्ताधाऱ्यांनीही रोजगार आणण्यासाठी लॉंग मार्च काढला. पण, रोजगाराच्या या खाणीतून उद्योग येण्याऐवजी भलतेच उद्योग सुरू झाल्याचे चित्र आहे. जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली काही स्थानिक व माती दलालांनी मोठ्या प्रमाणात मायनिंगसदृश्य माती तस्करी सुरू केल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांची तस्करी केल्याचीही चर्चा असून जिल्हा प्रशासनाचा 'तिसरा डोळा' एमआयडीसीत असूनही याकडे डोळेझाक का झाली ? तर उद्योगासाठी प्रयत्नशील असल्याचे वारंवार बोलून दाखवणारे जिल्ह्याचे सुपुत्र उद्योग मंत्री उदय सामंत व त्यांच खातं हा प्रकार होईस्तोवर काय करत होतं ? असा सवाल उपस्थित होतोय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्याची स्थापना केल्यानंतर माजी मुख्यमंत्री व तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २०१३ साली आडाळी एमआयडीसी मंजूर केली. स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा, दोन हातांना काम मिळावं या उद्दात्त हेतूनं त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, आज त्या जागेत रोजगार निर्माण होण्याऐवजी भलताच 'उद्योग' सुरू झाला आहे. जिथून व्यवसायासाठी लागणाऱ्या मालाची ट्रान्सपोर्ट होण अपेक्षित होतं तिथून भलतीच वाहतूक होत आहे. माती उत्खनन करून या ठिकाणाहून कोट्यवधी रुपयांची तस्करी केल्याचीही चर्चा आहे. एका शेजारील गावात ही माती साठा करून मध्यरात्रीच्यावेळी डंपरच्या साहाय्याने ती वाहतूक चालत असल्याचेही वृत्त आहे. याबाबत दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांना विचारणा केली असता, यापूर्वीही आम्ही संबंधित ठिकाणाचा पंचनामा आम्ही केला होता. तसेच एमआयडीसीच्या जागेत हा प्रकार होत असल्याने प्राधिकरणाला देखील पत्र देण्यात आले होते. आतापर्यंत ५ पत्र दिल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. तसेच याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला विचारणा केली. प्राधिकरणाच्या जमीनीतून मातीची चोरी होत असून महसूल व पोलिस यंत्रणेला आम्ही याची कल्पना दिली आहे. चोरीचे प्रकार बघता आमच्या भागात सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी देखील वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी उप अभियंता अविनाश रेवंडकर यांनी दिली.
इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित झालेल्या या तालुक्यातील गाव बघता तसेच येथील माती बघता सपाटीकरणाच्या नावाखाली काढल्या जाणाऱ्या व अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार माती चोरी होणाच्या प्रकार बघता इथली 'सॉईल टेस्टींग' झालेली का ? मायनिंग सदृश्य ही माती चोरी करण्याच धाडस कोणता 'पुष्पा' करतोय ? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही या प्रकरणाची माहिती घेल्याचे समजते. त्यामुळे याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना फोन करण्यात आला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच उद्योगमंत्र्यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
एकंदरीतच, या प्रकरणाकडे जबाबदारीच्या टोलवाटोलवीत शासनाचा पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. तर स्थानिक पातळीवर 'पुष्पा' सिनेमातील स्टोरी सारख्या वेगळ्या चर्चांही आहेत. त्यामुळे जिथून उद्योग, व्यवसाय सुरू होण अपेक्षित होतं, तिथे सावळा गोंधळ सुरू आहे. आज हजारो युवक-युवतींना रोजगारासाठी शेजारील गोवा राज्यात जाव लागत आहे. हायवे अपघातात जीव गमवावे लागत आहेत. अशात जिल्ह्यातील या खाणीतून रोजगाराचा साठा बाहेर पडण अपेक्षित असताना भलताच धंदा काहींनी चालवला आहे. या प्रकरणाची या खात्याचे प्रमुख उद्योग मंत्री उदय सामंत तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.














