
सिंधुदुर्गनगरी : वैभववाडी तालुक्यातील अनेक नळपाणी पुरवठा योजनांची कामे अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदार निखिल घेवारी याला जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच अशी कारवाई असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
बांधकाम समिती सदस्य प्रमोद रावराणे यांनी मागील बैठकीत संबंधित ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेत त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने ही कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने समितीसमोर मांडली. त्यामुळे रावराणे यांच्या मागणीला यश मिळाले. यावेळी समितीने आणखी एक महत्त्वाचा ठराव मंजूर केला. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याची माहिती शासनाच्या इतर सर्व संबंधित विभागांना देण्यात यावी. तसेच त्याला कोणत्याही शासकीय विभागाकडून नवीन कामे देऊ नयेत, अशा आशयाचे पत्र संबंधित विभागांना पाठविण्याच्या सूचनाही समितीने दिल्या.
वैभववाडी तालुक्यातील रखडलेल्या नळपाणी योजनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कामे अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदारांना स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.










