
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील होडावडे येथील निसर्गप्रेमी मंगेश माणगावकर यांच्या बागेत अत्यंत दुर्मिळ आणि रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या अळंबीचे सलग चौथ्या वर्षी पुनरागमन झाले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण अळंबीमुळे होडावडे गाव आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अंधारात हिरवा प्रकाश पसरवणाऱ्या या दुर्मिळ अळंबीचे वैज्ञानिक नाव 'मायसेना क्लोरोफॉस' असे आहे. या प्रकारची अळंबी रात्रीच्या वेळी स्वतःमधून प्रकाश निर्माण करते, ज्याला शास्त्रीय भाषेत 'बायोल्युमिनेसेन्स' म्हटले जाते. या अळंबीची अधिकृत नोंद २६ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या 'जर्नल ऑफ थ्रेटंड टॅक्सा' या जागतिक स्तरावरील नामांकित वैज्ञानिक नियतकालिकेत (मॅगझिन) करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गमधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात अशा प्रकारच्या प्रकाशमान बुरशीची नोंद झाली होती. मात्र, 'मायसेना क्लोरोफॉस' या विशिष्ट प्रजातीच्या चमकणाऱ्या अळंबीची महाराष्ट्रातील ही पहिलीच अधिकृत नोंद ठरली आहे. भारतात यापूर्वी केवळ केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये ही अळंबी आढळली होती. आता या यादीत महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे.
ही अळंबी सलग चार वर्षांपासून सातत्याने उगवत असल्याने पर्यावरण अभ्यासक, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमींसाठी हा अभ्यासाचा एक मोठा विषय बनला आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या आधीच समृद्ध असलेल्या जैवविविधतेमध्ये मोलाची भर पडली असून, होडावडे गावाचे नाव पर्यावरण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. केवळ चमकणारी अळंबीच नव्हे, तर मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या परसबागेत निसर्गाचे उत्तम संवर्धन केले आहे. त्यांच्या या बागेत आढळणाऱ्या विविध प्रजातींचे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे, दुर्मिळ साप आणि विविध बेडकांच्या जातींची त्यांनी पद्धतशीरपणे नोंद ठेवली आहे. त्यांच्या या समृद्ध आणि निसर्गरम्य बागेला पाहण्यासाठी तसेच या चमकणाऱ्या अळंबीचा चमत्कार डोळ्यांत साठवण्यासाठी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि अभ्यासक सातत्याने होडावडे गावाला भेटी देत आहेत, असे त्यांनी बोलताना सांगितले.














