LIVE UPDATES

जीवाची पर्वा न करता पाण्याच्या वेगवान प्रवाहात उडी

पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांची केली थरारक सुटका
Edited by:
Published on: July 18, 2026 13:28 PM
views 366  views

सावंतवाडी : नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकल्याची थरारक घटना घडली. मात्र, माहिती मिळताच ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगली’च्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत या चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. एकूण दोन पुरुष व दोन महिला यामध्ये रामू जंगले, भागी जंगले व अन्य दोघांचा समावेश होता.         

मिळालेल्या माहितीनुसार, नांगरतासवाडी येथे हे शेतकरी व महिला शेतात भात लावणीचे काम करत होते. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास आंबोली परिसरात अचानक झालेल्या ढगफुटी सारख्या पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह आणि पातळी वाढली. त्यामुळे हे चारही जण त्यातून बाहेर पडू शकले नाहीत आणि पुरात अडकले. आंबोली पापडी पुलाच्या खाली आसोलकर मळ्यात ही घटना घडली.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, आपत्कालीन परिस्थितीत सदैव तत्पर असणाऱ्या 'सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप'चे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेस्क्यू टीममधील उत्तम नार्वेकर, सुजित नायर आणि मायकल डिसोजा, संतोष पालयेकर, राजू राऊळ, नारायण चव्हाण यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात उडी घेतली. या तिघांनी अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने पाण्यात अडकलेल्या चारही जणांपर्यंत पोहोचून त्यांना एक-एक करून सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढले. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे चार जणांचे प्राण वाचले असून, परिसरातून रेस्क्यू टीममधील जवानांचे आणि संपूर्ण ग्रुपचे कौतुक होत आहे. संकटकाळात हा ग्रुप नेहमीच देवदूत बनून मदतीसाठी तत्पर असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा या घटनेने आली आहे.