
वेंगुर्ला : वेंगुर्ले निमुसगा भागात लाईटहाऊसच्या मागे खडकावरून समुद्रात गळ टाकून मासे पकडत असताना तोल जाऊन समुद्राच्या पाण्यात पडून अणसूर येथील युवक सचिन सिताराम गावडे (वय ३१) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आज शुक्रवारी सायंकाळी लाईट हाऊसपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर किनारी भागात तरंगताना आढळून आला.
अणसूर-देऊळवाडी येथील रहिवासी असलेल्या सचिन गावडे याला पाण्यात गळ टाकून मासेमारी करण्याचा छंद होता. दरम्यान, गुरूवार दि.16 जुलै रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सचिन हा शंकर मेस्त्री (रा.अणसूर-मेस्त्रीवाडी) या आपल्या मित्रासोबत वेंगुर्ला येथील लाईटहाऊसच्यामागील परिसरात मासेमारी करण्यासाठी आला होता. परंतु, सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना काहीच मासे मिळाले नसल्याने ते घरी परतण्याच्या बेतात असताना एक शेवटचा गळ टाकण्याचा निर्णय घेतला. समुद्रात गळ टाकताना सचिन हा खडकावरून घसरून समुद्रात पडला आणि तो दिसेनासा झाला. त्याच्यासोबत असलेला त्यांचा मित्र शंकर मेस्त्री याने शोधाशोध केली. पण तो सापडला नाही. याबाबत मेस्त्री याने गावातील ग्रामस्थांना व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध केली. परंतु, तो रात्री उशिरापर्यंत आढळून आला नाही. आज शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहित सुरू केली. दरम्यान, सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास दाभोली येथील स्थानिक ग्रामस्थ आणि अणसूर येथील युवकांना लाईट हाऊसपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर किनारी भागात तरंगताना आढळून आला. तात्काळ त्यांनी दोरीच्या सहाय्याने सचिन याचा मृतदेह किनारी ओढत आणला. वेंगुर्ला पोलिसांनी त्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला.
सचिन हा गळ टाकून मासे पकडण्याच्या शर्यतीमध्ये सहभागी व्हायचा. त्याने अशा अनेक स्पर्धेत पारितोषिके पटकाविली होती. त्याच्या पश्चात आई, एक विवाहीत व एक अविवाहीत भाऊ, काका, काकी, दोन चुलत बहिणी असा परिवार आहे.










