LIVE UPDATES

कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉलमध्ये गैरप्रकार

जाब विचारल्याच्या रागातून एकाला मारहाण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 17, 2026 09:04 AM
views 3316  views

कणकवली : कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाण पुलाखाली असलेल्या एका अनधिकृत स्टॉलमध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याच्या आरोपावरून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित स्टॉलबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत स्टॉल मालकाला बोलावून जाब विचारला.

यावेळी स्टॉल बंद करण्यास सांगितल्याच्या रागातून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात सुमारे एक ते दीड तास तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर मारहाण करणाऱ्या व्यक्तीने उपस्थित नागरिकांची माफी मागावीे  तसेच संबंधित स्टॉल तातडीने हटवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, एवढा वेळ तणावाचे वातावरण असतानाही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.