
भलेही सरकारमध्ये कोकणातील लोकप्रतिनिधींची संख्या लक्षणीय राहिली असो, राज्याच्या राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले असो, कोकणच्या लोककला या नेहमीच दुर्लक्षित राहिल्या. आज या महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक इतिहास घडवण्यात कोकणी माणसाचा सिंहाचा वाटा आहे. कोकणच्या लाल मातीने घडवलेले अनेक कलाकार आजही अनेक वर्षांची आपली ही समृद्ध परंपरा जोपासत नाट्य, चित्रपट, संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. विशेषतः मायानगरी मुंबईचा विचार केला तर बॉलिवूड आणि मराठी चित्रपट, रंगभूमी, टीव्ही चॅनेल्स, सोशल मीडिया या सर्वांमध्ये कोकणी माणसांनीच या गौरवशाली महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा पुढे नेला आहे. हे सर्व इथे मांडण्याचे मुख्य कारण म्हणजे या सर्व कलाकारांची जी जननी आहे ती लोककला म्हणजे दशावतार. याच दशावतार लोककलेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला तो कोकणातील डॅशिंग आमदार निलेश राणे यांच्यामुळे. या दशावतारी कलाकारांच्या व्यथा त्यांनी सभागृहात मांडल्या आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महोदयांनी त्यावर अत्यंत चांगले निर्णय घेतले. दशावतार लोककलेला लोकाश्रय होता, परंतु आज खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला. कोकणवासीयांसाठी हा खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे.
अध्यात्म, प्रबोधन, लोककला, संगीत, नाट्य अशा सर्वच कलाप्रकारांचा अत्यंत चांगला संगम या दशावतारात पाहायला मिळतो. कोकणवासीय या दशावतारासाठी अक्षरशः आजही वेडे आहेत. अनेक दशावतारी कलावंतांनी यासाठी आपले जीवन वाहिले आहे. त्यांना लोकाश्रय होता, परंतु राजाश्रय मिळवण्यासाठी त्यांची परवड सुरू होती. अत्यंत जटिल अशा प्रशासकीय प्रक्रियेमुळे कलाकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. अनेक कलाकार मानधनापासून वंचित होते. ही परवड सुरू असतानाच या कलाकारांवर सर्वात वाईट वेळ आली ती कोरोनाच्या कालावधीत. या कालावधीत एकप्रकारे त्यांची उपासमारच सुरू होती. अशा वेळी त्यांच्या मदतीला सर्वात प्रथम धावून आले ते कोकणचं नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' . चॅनेलच्या स्टुडिओतून दशावताराचे प्रयोग यावेळी LIVE दाखविण्यात आले आणि स्क्रीनवर दिलेल्या स्कॅनरवरून या कलाकारांना बक्षीस स्वरूपात अर्थसहाय्य झालं. या कलेसाठी स्टुडिओची जागा अपुरी पडत होती, मात्र कोकणवासीयांच्या हृदयात दशावतारासाठी असणारी जागा ही आभाळापेक्षाही मोठी होती. जगभरातील कोकणवासीयांनी त्यावेळी जे काही प्रेम 'कोकणसाद LIVE' च्या माध्यमातून दाखवले, त्यामुळेच ही लोककला आणि लोककलाकार या कठीण प्रसंगावर मात करू शकले. एक सामाजिक भान आणि कोकणच्या भूमीबद्दल असणारी तळमळ यामुळे अडथळे येऊनही कोकणच्या या महाचॅनेलने या कलेला लोकाश्रय आणि कलाकारांना जगभरातील कोकणवासीयांचा आधार मिळवून दिला.
हे सर्व इथे पुन्हा नमूद करण्याचे कारण म्हणजे दशावतार ही लोककला म्हणजे कोकणचा प्राण आहे आणि तिला राजाश्रय देण्याची गरज होतीच. ही गरज लक्षात घेऊन कोकणच महाचॅनल 'कोकणसाद LIVE' पुन्हा एकदा पुढे सरसावलं आणि पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने दशावतार कलावंतांची व्यथा काही दिवसांपूर्वीच मांडली. 'कोकणसाद LIVE' मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची तात्काळ दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी दशावतार कलाकारांची कणकवलीत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दशावतार कलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक आणि कटिबद्ध असल्याचा शब्द दिला होता. तसेच सिंधूरत्न योजनेतून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आज दशावतारी कलाकारांच्या व्यथा अत्यंत पोटतिडकीने मांडण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या रूपाने कोकणातीलअजून एक लोकप्रतिनिधी पुढे आला आणि या कलाकारांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरला. अर्थात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अत्यंत दिलासादायक घोषणा केल्या असल्या तरी दशावतारी कलाकारांपर्यंत हे लाभ पोहोचण्यासाठी प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी आणखी कसरत करावी लागणार आहे.
हा विषय केवळ मानधनापुरता मर्यादित नाही, तर जगभरातील पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करण्यासाठी या दशावतारी कलावंतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दशावताराचे एक कायमस्वरूपी व्यासपीठ तयार करण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर विचार करायचा तर दशावतार ही लोककला हा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे ज्येष्ठ कलावंत आणि अभ्यासकांना त्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय किंवा विद्यापीठ पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. मानधन दुप्पट केल्याने दशावतार आणि दशावतारी कलाकार चांगल्या पद्धतीने जगू शकतील, मात्र शासकीय पातळीवर जर असे प्रकल्प राबवण्यात आले तर कोकणचा हा दशावतार जगाच्या सांस्कृतिक क्षेत्रात या गौरवशाली महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण करेल.
सागर चव्हाण
मुख्य संपादक, कोकणसाद














