
वेंगुर्ले : वेंगुर्ले निमुसगा भागात लाईटहाऊसच्या मागे खडकावरून समुद्रात गळ टाकून मासे पकडत असताना तोल जाऊन समुद्राच्या पाण्यात पडून अणसूर येथील युवक सचिन सिताराम गावडे (वय ३१) आज गुरुवार १६ जुलै रोजी सायंकाळी नापता झाला. एका मोठ्या लाटेबरोबर तो समुद्राच्या पाण्यात फेकला गेला आणि बुडाला. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नसल्याने याबाबत वेंगुर्ले पोलिस ठाण्यात नापता म्हणून नोंद करण्यात आली आहे.
अणसूर देऊळवाडा येथील हा युवक मित्रांसमवेत गरी ने मासेमारी करण्यासाठी वेंगुर्ले येथे आला होता. खडकावर बसून गरी ने मासेमारी करताना समुद्राच्या एका मोठ्या लाटेवर तो पाण्यात फेकला गेला. आणि काही वेळात पाण्यात दिसेनासा झाला. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात माहिती मिळतात वेंगुर्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उशिरापर्यंत त्याचा काही पत्ता लागलेला नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान याबाबत त्याच्यासोबत मासेमारी साठी गेलेल्या अणसूर सुतारवाडी येथील शंकर रविंद्र मेस्त्री (४०) याने याबाबत वेंगुर्ला पोलिसात खबर दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मोचेमाड समुद्र किनारी असाच गरीने मासेमारी करताना एक युवक बुडाला आहे. आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे.










