
देवगड : देवगड–नांदगाव मार्गावरील जामसंडे-वडांबा येथील एका खासगी रुग्णालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मोकाट गायीला दुचाकीची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात मिलिंद शामराव घाडी (वय ४०, मूळ रा. तळवडे, सध्या रा. जामसंडे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद घाडी हे देवगड येथे एका खासगी वाहनावर चालक म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम आटोपून ते आपल्या एमएच-०७-एक्यू-०३६५ क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरून जामसंडे येथील घरी जात होते. सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास जामसंडे-वडांबा येथील एका खासगी रुग्णालयाजवळ अचानक एक गाय रस्त्यावर आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची गायीला जोरदार धडक बसली.
धडकेचा जोर इतका प्रचंड होता की मिलिंद घाडी हे दुचाकीवरून दूर फेकले जाऊन रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अपघाताची बातमी समजताच देवगड, जामसंडे परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. तळवडे येथील कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच तेही रुग्णालयात दाखल झाले. पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नीने रुग्णालयातच हंबरडा फोडला. या हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मिलिंद घाडी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, देवगड–नांदगाव मार्गासह तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे मुक्तपणे वावरत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











