LIVE UPDATES

गोमांस सदृश्य मांसाची वाहतूक करणारी इर्टिंगा नेमळेत पलटी

अपघातानंतर पलायन करणाऱ्या चालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 10, 2026 10:23 AM
views 307  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर नेमळे फौजदारवाडी येथे गोमांससदृश्य मांसाची अति वेगाने वाहतूक करणारी एक इर्टिंगा कार दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना शुक्रवारी, १० जुलै रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला स्थानिकांनी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारमधून सुमारे ४०० ते ५०० किलो मांस हस्तगत करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी चालक सद्दाम दलावसाब यलवट्टी (वय ३१, रा. यंगणवाडी नगर पेडणे-गोवा, सध्या रा. कलंगुट-गोवा, मूळ रा. हुबळी-कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे. प्रथमदर्शनी ही कार कर्नाटकातील अभय नामक व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी सद्दाम यलवट्टी हा आपल्या ताब्यातील इर्टीगा कारमधून गोमांससदृश्य ४०० ते ५०० किलो मांस घेऊन निपाणी-राधानगरी मार्गे गोव्याच्या दिशेने अति वेगाने जात होता. महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकाला (डिवायडर) धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याच्या पलीकडे जाऊन रस्त्यालगत पलटी झाली. कार पलटी होताच त्यातील मांस रस्त्यावर बाहेर पडले. आपण पकडले जाऊ या भीतीने चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी सावंतवाडीतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित चालक सद्दाम याला पकडले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार दीपक शिंदे, पोलीस हवालदार मनोज राऊत आणि हवालदार अनिल धुरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अपघातग्रस्त कारसह ४०० ते ५०० किलो मांस हस्तगत केले आणि चालकाला ताब्यात घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणले. संशयित आरोपीवर अटकेची कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक हे मांस निपाणी येथून आणल्याचे सांगत असला, तरीही सदर मांस बर्फात ठेवलेले नव्हते. त्यामुळे हे मांस सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच गोव्याच्या दिशेने नेले जात असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता, या गाडीचा मालक अक्षय नामक असून संशयिताने यापूर्वीही याच मार्गाने गोव्यात मांसाची वाहतूक केल्याची कबुली दिल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.