LIVE UPDATES

ना रुजला विचार...ना बहरला सहकार..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 04, 2026 18:54 PM
views 96  views
#kokansadlive#news update#konkan update#

पश्चिम महाराष्ट्राने सहकाराच्या बळावर आर्थिक क्रांती घडवली. साखर कारखाने उभे राहिले, दूध संघ वाढले, सहकारी बँकांचे जाळे विस्तारले आणि गावोगावी रोजगार निर्माण झाला. मात्र, कोकण  नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असूनही सहकाराच्या बाबतीत मागे राहिला. हा केवळ भौगोलिक प्रश्न नाही, तर मानसिकतेचा प्रश्न आहे.कोकणात आंबा आहे, काजू आहे, मासेमारी आहे, पर्यटन आहे, मेहनती लोक आहेत. मग सहकार का वाढला नाही? कारण इकडे एखादी व्यक्ती पुढे जात असेल, एखादी संस्था उभी राहत असेल तर त्याला हात देण्याऐवजी त्याचे पाय खेचण्याची स्पर्धा सुरू होते. गटबाजी, अहंकार आणि वैयक्तिक वैर यामध्ये सामूहिक हित हरवून जाते.

शेतकरी आणि सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी जिथे प्रशासन कमी पडत होते तिथे सहकार एक संजीवनी ठरला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सहकार जोमाने वाढला. तिकडे सहकाराच्या रोपट्याचा वटवृक्ष बनवला. कोकणात मात्र सहकार म्हणावा तसा रुजला नाही.  याचे मुख्य कारण म्हणजे कोकणवासीयांनी मानसिकता. ती बदलणे हे आजही आव्हान आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आपली राजकीय पकड मजबूत करून किंवा मजबूत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सहकाराचा आधार घेतला. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ...या विचारानुसार हा व्यवहार झाला. कोकणात मात्र कोकणवासीय मूलभूत सुविधांच्याच प्रतिक्षेत होते, सहकार वगैरे या खूप लांबच्या गोष्टी आहेत. आणखी एक कारण म्हणजे भौगोलिकता. पश्चिम महाराष्ट्रात ऊस पिकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे सहकार तत्वावर आधारित साखर कारखाने उभारले गेले. सूतगिरण्या झाल्या. राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचा पहिल्यापासून वरचष्मा आहे, त्यामुळे खास सहकारासाठी नवीन धोरणे आखण्यात आली, जी राज्यकर्त्यांना फायदेशीर होती. त्याचा फायदा अनेकांनी घेतला. कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली आणि राजकारणासाठी त्याचा सोयीने वापरही करण्यात आला. कोकणात मात्र त्यावेळी भात पीक सोडले तर सामान्य शेतकऱ्यांकडे दुसरे काहीच नव्हते. आंबा, काजू, नारळ यात प्रक्रिया करण्यासारखे खूप उद्योग होते, मात्र ते उभारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती अपुरी पडली. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून असे उद्योग उभारण्याची कोकणवासीयांची उदासीनता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ही वस्तुस्थिती आहे. 

आजही गांभीर्याने विचार केला तर कोकणात सहकार रुजावा, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. फक्त जसा आज जागतिक सहकार दिन आहे म्हणून कुठेतरी कागदोपत्री कार्यक्रम केल्यासारखा दाखवायचं, तसे मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जातात. एकदा तो दिवस संपला आणि मागे वळून पाहिले तर सहकाराचे तिनतेरा वाजलेले दिसतात. सहकाराची कार्यशैली आणि त्याचे फायदे कोकणवासीयांना समजून देण्यात येथील राजकीय नेतृत्वाला अपयश आले किंवा यात कोकणी माणसाच्या मानसिकतेचा अडसर आला, याचे गांभीर्याने आत्मपरीक्षण केले तर सहकार हा कोकणासाठी वरदान ठरणार आहे. 

सहकार म्हणजे "मी" नव्हे, "आपण". पण कोकणात अनेक ठिकाणी "माझे" आणि "तुझे" या वादात "आपले" हरवले. परिणामी मोठे सहकारी उद्योग उभे राहिले नाहीत. अनेक संस्थांमध्ये अंतर्गत कलहामुळे संस्था अडचणीत आल्या. गाव पातळीवरील शेती सोसायटी, तालुक्यातील खरेदी विक्री संघ, जिल्हा बँक, यामध्ये स्थानिक पुढाऱ्यांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष सुरु राहिला. एखादा संचालक, कार्यकर्ता चांगले काम करत असेल, नवीन संकल्पना राबवत असेल तर त्याला सहकार्य करण्याऐवजी त्याच्या बदनामीसाठी राजकारण केले जाते. त्यामुळे संस्था बळकट होण्याऐवजी वैयक्तिक राजकारणाचे केंद्र बनले. राजकीय हस्तक्षेप वाढू लागला. त्याशिवाय  निर्णय प्रक्रियेत एकी नसणे, एकाधिकारशाही करणे, आपले तेच खरे करणे, एकमेकांवर कुरघोडी करणे, पारदर्शक कारभार नसणे याचा मोठा फटका येथील सहकार क्षेत्राला बसला. अजून एक सहकाराला लागलेले ग्रहण म्हणजे 'पारदर्शक भ्रष्टाचार'. अनेक सहकारी संस्थांमध्ये व्यवहार कागदोपत्री व्यवस्थित दिसत असले तरी प्रत्यक्षात बरच काही दडलेलं असतं. या सगळ्या राजकारणातून सहकारात कोकण हे मागेच राहिले. 

पश्चिम महाराष्ट्रातही मतभेद आहेत, राजकारण आहे, स्पर्धा आहे. पण चांगल्या कार्यासाठी सर्वजण एकत्र येतात. कारण त्यांना माहिती आहे की सामूहिक प्रगतीतच वैयक्तिक प्रगती दडलेली असते. इकडे मात्र व्यक्ती मोठी ठरली आणि संस्था लहान राहिली.कोकणातील लाखो तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि परराज्यात गेले. जर गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील सहकारी संस्था मजबूत झाल्या असत्या,  सहकारी उद्योग उभे राहिले असते, तर कदाचित ही स्थलांतराची वेळ आली नसती. आंबा, काजू, मासे, पर्यटन यावर आधारित शेकडो प्रक्रिया उद्योग उभे राहू शकले असते. शेतकऱ्याला आणि मच्छीमाराला योग्य भाव मिळाला असता. पण त्यासाठी लागणारी एकजूट निर्माण झाली नाही. राजकारणानेही या परिस्थितीचा फायदा घेतला. सहकारी संस्था सक्षम करण्यापेक्षा त्या राजकीय वर्चस्वाचे साधन बनल्या. आज सहकारात राजकारण घुसले असून  निवडणुका जिंकण्यासाठी सहकाराचा वापर झाला आहे.

  इथल्या लोकांमध्ये आजही प्रचंड क्षमता आहे. पण दुसऱ्याला खाली खेचण्याची मानसिकता बदलावी लागेल. जो पुढे जातो, त्याला अडवण्याऐवजी त्याच्या यशातून संपूर्ण समाजाचा फायदा कसा होईल, हा विचार करावा लागेल. ज्या दिवशी कोकणी माणूस दुसऱ्याच्या यशाकडे आकसाने नव्हे तर अभिमानाने पाहू लागेल, त्या दिवशी कोकणातही सहकाराची क्रांती घडेल. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण थांबविणे काळाची गरज बनली आहे. सर्वात मोठी अडचण  म्हणजे एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती. ती बदलली तर कोकण बदलायला वेळ लागणार नाही.

ज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका घ्याज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी : 

सहकार चळवळ उभी करण्यात ज्येष्ठ नेतृत्वाचे योगदान नाकारता येणार नाही. त्यांच्या अनुभवामुळे अनेक संस्था टिकल्या, संकटांवर मात झाली आणि अनेक कार्यकर्ते घडले. मात्र, काळ बदलला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात सहकारात नवीन विचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक दृष्टिकोनाची गरज आहे. म्हणूनच आता ज्येष्ठांनी खुर्चीला चिकटून राहण्याऐवजी मार्गदर्शक, सल्लागाराची भूमिका स्वीकारण्याची वेळ आली आहे. नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याची वेळ आली आहे. तरुणांना कधी सहकारात संधीच मिळाली नाही. वर्षानुवर्षे त्याच त्याच चेहऱ्यांच्या भोवती सहकार फिरत राहिला. काही वेळा नेतृत्व निर्माण करण्या ऐवजी नेतृत्व जपण्याची मानसिकता दिसून आली. नवीन चेहरे पुढे आले की त्यांना मागे कसे खेचायचे या राजकारणात जेष्ठांचा वेळ जात आहे. कोकणात तरुणांना संधी दिली तर सहकाराला नवसंजीवनी मिळू शकते. त्यांना केवळ सभासद बनवून चालणार नाही. तर संचालक मंडळात, निर्णय प्रक्रियेत घ्यावे लागेल. याचा अर्थ जेष्ठानी घरी बसणे नव्हे, तर ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांच्या नवनवीन संकल्पनांच्या जोरावर कोकणातील सहकार नव्या उंचीवर पोहोचू शकतो. त्यामुळे खुर्चीवर चिकटून राहण्यापेक्षा जेष्ठानी आता तरुणांकडे नेतृत्व देऊन स्वतः मार्गदर्शकाची भूमिका घेणे गरजेचे आहे.


कृष्णा ढोलम, 

सहाय्यक संपादक, (वृत्त ) कोकणसाद