
देवगड :नामदेव शिंपी समाज मंडळ, डोंबिवली यांच्या वतीने आयोजित ५९ व्या संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त डोंबिवली पूर्व येथील शुभमंगल कार्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१४ पासून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या सान्वी सिद्धिविनायक कुबडे (रेशनिंग इन्स्पेक्टर, महाराष्ट्र शासन) यांचा समाजाच्या वतीने विशेष ‘गुणगौरव सत्कार’ करण्यात आला.
सान्वी कुबडे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील सून असून, मालवण तालुक्यातील कट्टा-गोळवण येथील कन्या आहेत. त्यांच्या उल्लेखनीय शासकीय सेवाकार्याबद्दल तसेच स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे तसेच ठाणे जिल्हा नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष रवींद्र भानुदास कालेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी सान्वी कुबडे यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना सान्वी कुबडे म्हणाल्या, “प्रशासकीय सेवेत काम करताना संत नामदेवांचे विचार आणि त्यांची समाजसेवेची शिकवण हीच खरी प्रेरणा ठरते.” यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना अभ्यासाचे नियोजन, नियमित सराव आणि सातत्य याबाबत मार्गदर्शन केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नामदेव शिंपी समाज महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विशेषतः किशोरी मुळे आणि श्रुती उरणकर यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप सलागरे, कार्यवाह गणेश पांढरकामे, खजिनदार गिरीश गोरे यांच्यासह समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











