LIVE UPDATES

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे कुणकेश्वर चरणी लीन

पहिल्या श्रावण सोमवारी विधिवत पूजा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 17, 2026 10:44 AM
views 265  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड  : श्रावण मासाची सुरुवात आणि त्याच दिवशी आलेला श्रावणी सोमवार व नागपंचमीचा पवित्र योग यामुळे श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आजचा दिवस भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. श्रावणातील पहिल्या सोमवारी पहाटे श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.

आज, १७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५ वाजता जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची श्रावण मासातील पहिली पूजा संपन्न झाली. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. अवंतिका कुलकर्णी तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. संजय लक्ष्मण गावडे (हॉटेल अतिथी बाम्बू, मालवण) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून स्वयंभू श्री देव कुणकेश्वराच्या चरणी अभिषेक व पूजन करण्यात आले.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शिवभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा दिवस मानला जातो. त्यातच यंदा श्रावण मासाची सुरुवात, पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यामुळे पहाटेपासूनच श्री कुणकेश्वर मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

श्रावणी सोमवार उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. पावसापासून संरक्षणासाठी मंडप व्यवस्था, दर्शनरांग व्यवस्थापन, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त व वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवकांचेही नियोजन करण्यात आले आहे.

श्रावणी सोमवारनिमित्त प्रत्येक सोमवारी मंदिरामध्ये विविध भजन मंडळांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दानशूर देणगीदारांच्या सहकार्याने मोफत साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी आणि नागपंचमीच्या पावन पर्वावर श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ केशव तेली यांनी केले आहे.