LIVE UPDATES

सिंधुदुर्गात गांजा विक्रेत्यांसह मटका-जुगारालाही करणार हद्दपार

पालकमंत्री नितेश राणेंचा इशारा : आडाळी एमआयडीसीला १०० कोटींचे अनुदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 18:26 PM
views 631  views

सिंधुदुर्गनगरी : नशामुक्त सिंधुदुर्गच्या मोहिमेला आता मटका-जुगारमुक्त जिल्ह्याची जोड देणार असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच गांजा विक्री करणाऱ्या एकाही व्यक्तीला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही, असा कडक इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

स्वातंत्र दिन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी परजिल्ह्यात गेलेल्या युवकांना पुन्हा जिल्ह्यात आणून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. पारंपरिक व्यवसायांना पूरक रोजगार निर्माण करणारे प्रकल्प जिल्ह्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जलवाहतूक तसेच अंडरवॉटर मेट्रोसाठी आवश्यक साहित्य निर्मितीचे कारखाने जिल्ह्यात आणण्याचीही योजना असल्याचे राणे यांनी सांगितले.

दोन शिपयार्डसाठी जागेचा शोध

जिल्ह्यात दोन शिपयार्ड आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, त्यासाठी योग्य जागेचा शोध घेतला जात आहे. पंचतारांकित हॉटेल्स जिल्ह्यात यावीत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आमदार दीपक केसरकर यांचे मोठे योगदान असल्याचे राणे यांनी नमूद केले. शिरोड्यासह देवगड येथेही पंचतारांकित हॉटेलचा प्रस्ताव आला असून, जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा हॉटेलमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतील आणि त्यातून जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गणपती प्रवास विमानाने होण्यासाठी प्रयत्न

गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांचा प्रवास विमानाने व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला लवकरच यश मिळेल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग व प्रकल्प आणण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणविरोधी प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनी आता जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या सकारात्मक वातावरणाचे अभिनंदन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आडाळी एमआयडीसीला १०० कोटींचे अनुदान

जिल्ह्याकडे गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत असून, आडाळी एमआयडीसीच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून १०० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

कुपोषणमुक्त जिल्ह्यासाठी प्रयत्न

सिंधुदुर्ग कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीनेही वाटचाल सुरू आहे. रोजगार आणि उद्योगांसोबतच सामाजिक विकासालाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नशामुक्तीसोबत मटका-जुगारमुक्त सिंधुदुर्ग

अवैध दारू वाहतूक, मटका, जुगार आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले. नशामुक्त सिंधुदुर्गसोबतच मटका आणि जुगारमुक्त जिल्हा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची शासनाची तयारी आहे. गांजा विक्री करणाऱ्या एकाही व्यक्तीला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो

विकासाच्या प्रक्रियेत होणाऱ्या टीकेकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहतो. जिल्ह्यात विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून, या बदलाचे विरोधकांनीही अभिनंदन केले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री राणे यांनी केले.