
ज्या हातांनी चिमुकल्या बोटांना धरून जगाची वाट दाखवली, ज्या खांद्यांवर बसवून अख्खं जग फिरवलं आणि ज्या बापाने स्वतःचे आयुष्य पणाला लावून लेकींना शिक्षणाच्या शिखरावर पोहोचवले, त्याच बापाच्या नशिबी वृद्धापकाळात एकाकीपणाचा अंधार आणि शेवटी असा अभागी शेवट यावा? सोनीपतच्या वृद्धाश्रमात घडलेली ही घटना केवळ एक बातमी नाही, तर आजच्या निष्प्राण, संवेदनहीन समाजाच्या छाताडावर उमटलेली एक काळी भळभळती जखम आहे.
शिवचरण राम रतन गुप्ता... कधीकाळी मुंबईच्या गजबजलेल्या बाजारात कापडाचा व्यवसाय सांभाळणारे एक कर्तबगार वडील. घरात मुलगा नाही म्हणून त्यांनी कधी खंत बाळगली नाही; उलट आपल्या तिन्ही लेकींना अनिता, निशा आणि प्रिया यांना आपल्या काळजाचा तुकडा मानून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लहानाचे मोठे केले. स्वतःच्या सुखांची आहुती देऊन, पोटाला पीळ मारून मुलींना उच्चशिक्षित केले, त्यांना शिक्षिका बनवून स्वतःच्या पायावर उभे केले. बापाला वाटले होते, आपण ज्ञानाचे रोपटे लावले आहे, उद्या त्याचे छायादार वटवृक्षात रूपांतर होईल. पण त्या बापड्याला कुठे ठाऊक होते, ज्या लेकींना त्याने 'अक्षर' ओळख शिकवली, त्या लेकीच आयुष्याच्या शेवटी बापाच्या मायेचं मोल विसरतील!
पत्नीच्या निधनानंतर शिवचरण यांचा संसार पार विस्कटला. हक्काची माणसं असतानाही ते परके झाले आणि शेवटी त्यांची रवानगी सोनीपतच्या एका वृद्धाश्रमात झाली. दीड वर्ष ते तिथल्या एका कोपऱ्यात, डोळ्यांत आशेचे पाणी घेऊन लेकींच्या वाट पाहत जगले. बिछान्याला खिळलेले, आजाराने जर्जर झालेले शिवचरण शेवटच्या २० दिवसांत प्रत्येक क्षणी दाराकडे डोळे लावून बसले असतील... वाटले असेल, एका तरी लेकीचा मायेचा हात कपाळावर पडेल, "बाबा" म्हणून कोणीतरी गळ्याला पडेल. वृद्धाश्रमाचे संचालक वारंवार फोन करून लेकींना वडिलांच्या ढासळत्या प्रकृतीची विनणी करत होते, पण शिक्षिका असलेल्या लेकींकडे 'वेळ' नव्हता! हळूहळू मुलींनी फोन उचलणेही बंद केले. शेवटी, एका बापाचा श्वास सुटला... लेकींच्या एका शब्दासाठी तडपणारे ते डोळे सदासर्वकाळासाठी मिटले.
निधनानंतर तरी लेकी धावून येतील, या आशेने वृद्धाश्रमाने मृतदेह तसाच ठेवण्याची तयारी दर्शवली. पण विधात्यालाही वाटली नसेल एवढी पाषाणहृदयी ती उत्तरं आली "आमच्याकडे वेळ नाही!"
ज्या बापाने संपूर्ण आयुष्य लेकींच्या भविष्यासाठी वेचले, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मुलींकडे वेळ नव्हता. एका शिक्षिका लेकीने थेट ऑनलाइन ५,१०० रुपये पाठवून दिले आणि निरोप दिला "अंत्यसंस्कार उरकून घ्या!" मोबाईलच्या थंड पडद्यावर व्हिडिओ कॉलवरून बापाचे अंतिम दर्शन घेतले गेले आणि विधींचे व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवण्याची हुकुमशाही फर्मावली गेली. एवढेच नाही, तर बापाच्या अस्थी गंगेत विसर्जित करायलाही या लेकींना वेळ मिळाला नाही; 'तुम्हीच विसर्जन करून टाका' म्हणून त्यांनी बापाच्या अस्थींचाही व्यवहार करून टाकला.
५,१०० रुपयांच्या ऑनलाईन व्यवहारात बापाच्या जन्मभराच्या ऋणाची किंमत चुकवली गेली. ज्या लेकींना ज्ञानाची आणि संस्कारांची भाषा शिकवायची होती, त्यांनीच नात्यांची अशी होळी केली. आज शिवचरण यांच्या देहाची राख झाली असेल, पण त्यांच्या तळतळाटाने आणि विझलेल्या डोळ्यांतील अश्रूंनी निसर्गाचा नियम हादरला असेल.
पैसा, प्रतिष्ठा आणि शिक्षणाचा आव आणणाऱ्या या जगात, बापाच्या प्रेमाची अशी लाजीरवाणी विक्री पाहून देवही आज आभाळातून रडला असेल. ५,१०० रुपयांत बापाचा अंतिम निरोप विकणाऱ्या या लेकींना काळ कधी माफ करेल का?














