LIVE UPDATES

गॅस ग्राहकांच्या लढ्याला यश | मनिष दळवींनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 21:15 PM
views 48  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या कारभाराविरोधात काही गॅस ग्राहकांकडून वेंगुर्ला गॅस सर्व्हिसवर कडक कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडण्यात आले.  या उपोषण स्थळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या सहित शिवसेना-भाजपचे अनेक पदाधिकारी ठाण मांडून होते. दरम्यान सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी एचपी कंपनीचे सेल्स ऑफिसर यांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी कारवाईसाठी दिरंगाई होत असल्याने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या कारभाराविरोधात तात्काळ कडक कारवाई करण्याच्या मागण्यांसाठी गॅस ग्राहक नवनाथ सातार्डेकर यांच्यासहित तालुक्यातील २१ गॅस ग्राहक यांच्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनी  उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषण स्थळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यासहित सर्व नगरसेवक शिवसेना-भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून होते. 

यावेळी मनीष दळवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या मात्र कारवाईसाठी दिरंगाई होत असल्याने मनीष दळवी आक्रमक झाले. यानंतर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत फोन द्वारे चर्चा करून सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. यावेळी पालकमंत्री यांनी सुद्धा तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या.  यानंतर सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे व एचपी कंपनीचे सेल्स ऑफिसर महेश जानी यांनी वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या गोदामाची सखोल चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तहसीलदार यांना सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी एचपी कंपनी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या वतीने उघड्या जागेत करण्यात आलेल्या गोडाऊन चा पंचनामा करून त्या ठिकाणी आढळून आलेले गॅस सिलेंडर ताब्यात घेण्यात आले. तसेच या आढळून आलेल्या सिलेंडर बाबत संबंधित एजन्सीवर नियमानुसार एचपी कंपनी द्वारे कार्यवाही केली जाईल, तसेच सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून व कार्यवाही करून तहसीलदार वेंगुर्ला याना त्वरित सादर करणेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. पुढील दोन दिवसांमध्ये नियमितपणे गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन एचपी कंपनीद्वारे करण्यात येणार असून अन्य कोणत्याही अडचण निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. या कारवाईमुळे गॅस ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे.