LIVE UPDATES

साटेली - भेडशीत दुचाकी अपघातात २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

दुसऱ्या जखमी युवकावर बांबोळी येथे उपचार सुरू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 19:30 PM
views 209  views

दोडामार्ग : साटेली - भेडशी येथे दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाले आहे. मुदस्सर मशुद सय्यद (२२) असे मयत युवकाचे नाव असून दानिश हुसेन सय्यद (२१, दोघेही रा. आवाडे) जखमी युवकाचे नाव आहे. जखमेवर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुदस्सर व दानिश हे दोघेजण दुचाकीने दोडामार्गला कामानिमित्त गेले होते. दोडामार्गहून साटेली-भेडशीच्या दिशेने जात असताना त्यांची दुचाकी अत्यंत भरधाव होती. त्यामुळे साटेली -भेडशी येथील मैदानाजवळील वळणावर दुचाकीवरील स्वाराचे नियंत्रण सुटल्याने ती घसरून रस्त्यावर आदळली. या अपघातात दोन्ही युवकांना गंभीर दुखापत झाली. दोघांच्या डोक्यातून व तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव येत होता. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुदस्सर यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. हा अपघात इतका भीषण होता की मुदस्सरचे डोके फुटून मेंदू बाहेर आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. जखमी दानिशवर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर येथे होता शिक्षणासाठी 

मुदस्सर हा कोल्हापूर येथे शिक्षणासाठी राहत होता. त्याच्या आजोबांचे निधन झाल्याने रविवारी त्यांची चाळिस दिवसांची विधीक्रिया होती. यानिमित्त तो आवाडे येथे आला होता. मात्र नियतीच्या मनात वेगळेच लपले होते. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.