
दोडामार्ग : साटेली -भेडशी येथे दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्गहून साटेली-भेडशीच्या दिशेने दोघे युवक दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी अत्यंत भरधाव होती. त्यामुळे साटेली -भेडशी येथील मैदानाजवळील वळणावर दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती घसरून रस्त्यावर आदळली. या अपघातात दोन्ही युवकांना गंभीर दुखापत झाली. दोघांच्या डोक्यातून व तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव येत होता. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते .










