खैर लाकडाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 21, 2026 19:30 PM
views 62  views

सावंतवाडी  : इन्सुली-बांदा राज्यमार्गावर वनविभागाने खैर लाकडाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. आठ दिवसांपूर्वीच एक टेम्पो पकडल्याची घटना ताजी असताना, शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा १० लाखांच्या खैर लाकडासह ट्रक पकडून वनविभागाने तस्करांना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी तळवडे येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वनविभागाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोडामार्ग येथून विनापरवाना खैराच्या लाकडाची एक मोठी खेप एका टेम्पोतून (क्र. एम एच ०७ ए जे ९१११ ) नेली जाणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आजगांव वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप आणि पाडलोसच्या वनरक्षक पथकाने इन्सुली येथील खामदेव नाका परिसरात रात्रीच्या वेळी सापळा रचला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संशयित टेम्पो खामदेव नाका येथे पोहोचताच वनविभागाच्या पथकाने त्याला अडवले. गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणात खैराच्या लाकडाचा साठा भरलेला आढळला. याप्रकरणी वाहनातील संशयित आरोपी मितेश शरद लोके (वय ३०, रा. तळवडे) आणि दीपक विठोबा हरमलकर (वय ३२, रा. तळवडे) या दोघांना पथकाने जागीच ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ९ ते १० लाख रुपये किमतीचे खैराचे लाकूड आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. हा सर्व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी उपरल येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या दोन्ही संशयितांविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने खैर माफियांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाच्या या सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरीमुळे लाकूड तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही यशस्वी कारवाई वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली असून या प्रकरणाचा अधिक तपास वनविभाग करत आहे.