‘कोकणसाद’चे सागर चव्हाण मुख्य संपादक

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 01, 2026 07:05 AM
views 77  views

सावंतवाडी : कोकणचे नंबर १ महाचॅनेल ‘कोकणसाद LIVE’ आणि कोकणचे पहिले दैनिक ‘कोकणसाद’च्या मुख्य संपादकपदी सागर चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनादिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.


याचबरोबर, सिंधुदुर्गातील आघाडीच्या कोकणसाद या माध्यमात काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संदीप देसाई संपादक (बिझनेस), अर्जुन धस्के सहायक संपादक (निर्मिती), कृष्णा ढोलम सहायक संपादक (वृत्त), विनायक गांवस मुख्य वार्ताहर अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. ‘कोकणसाद’चे संपादक संचालक संजय ना. ढवळीकर आणि फोमेंतो समूहाचे मनुष्यबळ विभागप्रमुख कर्नल अरुणकुमार शर्मा यांनी सावंतवाडी येथील ‘कोकणसाद’च्या कार्यालयात ही घोषणा केली.

कोकणात सर्वप्रथम डिजिटल मीडिया सुरू करण्यासाठी सागर चव्हाण यांनी एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी पुढाकार घेतला होता. कोकणाच्या गावागावातील बातम्या जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत परिश्रम घेतले. याच माध्यमातून आज ‘कोकणसाद लाईव्ह’ आणि दै. ‘कोकणसाद’ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. ‘कशाला उद्याची बात, आता बातमी एका क्षणात...’ हे ब्रीद घेऊन त्यांनी घडलेली बातमी काही सेकंदांत डिजिटल माध्यमातून देण्याची परंपरा सुरू केली, ती आजही अखंडपणे चालू आहे.

तत्परतेने बातम्या देण्याबरोबरच धडपड्या पत्रकारांची सक्षम टीम बांधण्याचेही काम सागर चव्हाण यांनी केले. फोमेंतो समूहाचे महाराष्ट्रातील माध्यम असणाऱ्या ‘कोकणसाद LIVE आणि दै. ‘कोकणसाद’च्या व्यवस्थापनाने याची दखल घेऊन मुख्य संपादकपदी त्यांची नेमणूक केली आहे.