LIVE UPDATES

निरूखे पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न निलेश राणेंच्या माध्यमातून सुटणार

दत्ता सामंत यांचे प्रतिपादन : २०० ग्रामस्थांना मोफत एनसीएमसी कार्डचे वाटप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 24, 2026 20:21 PM
views 38  views

​कुडाळ: निरूखे पांग्रड गावातील प्रलंबित मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असून मोफत एनसीएमसी (NCMC) कार्ड वाटपाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले.

​शिवसेनेच्या वतीने आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने निरूखे ग्रामपंचायत हॉल येथे एसटी बस सवलत असलेल्या एनसीएमसी कार्डचे मोफत वाटप रविवारी पार पडले. या शिबिराद्वारे गावातील २०० गरजू नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, भारतीय चर्मकार समाज मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण, सरपंच कीर्तिकुमार तेर्से, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, प्रथमेश केळबाईकर, किरण नाईक, सत्यवान गुरव, संस्कृती पालव, सिद्धी तेरसे, रिया नाईक, बाळकृष्ण तेरसे, मुकेश पालव, रामदास करंदीकर, विष्णू नाईक, सुनील परब, सरिता तेरसे, रोशन गावकर, प्रसाद नाईक, बबन मेस्त्री, सुहास तेरसे व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील वाहतुकीचे प्रमुख साधन एसटी बस आहे. एसटीच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार निलेश राणे सतत प्रयत्नशील असून त्यांनी कुडाळ आणि मालवण मतदारसंघासाठी सुमारे २५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या कार्डसाठी लागणारे २०० रुपये नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करून ग्रामस्थांना हे कार्ड मोफत देण्यात आले आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निरुखे गावाला कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या उपक्रमाचे आयोजक व श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. स्वतःचा वेळ खर्च करून सामान्य व गरीब ग्रामस्थांसाठी सेवाभावी वृत्तीने असा कॅम्प आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले.